चार तासाच्या रेस्कूनंतर वनविभागाने बिबट्याला अडकवे जाळ्यात
संतोष रोकडे/अर्जुनी मोरगाव,दि.-6ः-तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथील देवचंद शेंडे यांच्या परसबागेतील सुबाभळीच्या झाडावर एका बिबट्याच्या पिल्ल्याने आश्रय घेतल्याने पिंपळगावात एकच खळबळ उडाली.त्या बिबट्याला बघण्यासाठी आज(दि.6)दुपारी 12 वाजेपासूनच नागरिकांनी तोबा गर्दी करायला सुरवात करीत तो वनविभागाच्या जाळ्यात येईपर्यंत हा थरार अनुभवला.तब्बल 4 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला जाळ्यात पकडून ताब्यात घेतले.नंतर जंगलात नेऊन सोडून दिले.तेव्हा कुठे पिंपळगाववासियांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पिंपळगाव येथील मध्यवस्तीत देवचंद शेंडे यांचे घर आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास बिबट्या हा शेंडे यांच्या परसबागेतील बाभळीच्या झाडावर असल्याचे दिसून आले. देवचंदने झाडावर बिबट असल्याचे समजताच आरडाओरडा करायला सुरवात केली.आरडाओरडमुळे क्षणभरातच गावात ही बातमी पोचली आणि उत्सुकतेने झाडावर चढलेल्या त्या बिबट्याला बघण्यासाठी दोन ते अडीच हजाराची गर्दी देवचंदच्या घराभोवती जमली.वनविभागालाही बिबट्या गावातील एकाच्या परसबागेतील झाडावर चढल्याचे कळविण्यात आले.वनविभागाच्या चमूनेही वेळ न गमावता आपल्या रेस्कू चमूला घेऊन देवचंदचे घर गाठले.नवेगावबांध प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे यांच्या नेतृत्वात एन. के. सरकार, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी शिंदे, बहुरे ,वनरक्षक मिथुन चव्हाण यांनी बिबट्या चढलेल्या झाडाच्या भोवताल जाळे पसरवले.बिबट झाडाखाली उतरला तर जाळीत फसेल असा कयास होता. परंतु बिबट्याने चकमा देत घटनास्थळावरून पोबारा करीत एका पडक्या घराचा आश्रय घेतला. त्या घराची पुढची बाजू एका दिशेला मोकळी होती.तर मागचा भाग बंदिस्त असल्यामुळे, त्या घरात एका पेटी शेजारी लपून बसलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळं टाकून पकडले. वनविभागाच्या अथक चार तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर हे थरारनाट्य संपले.
सदर बिबट पाच सहा महिन्याचा असावा असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी दोनोडे यांनी सांगितले. गेल्या चार-पाच दिवसांपासून गावाभोवताल ऊसाची शेती असल्यामुळे व जंगल लागून असल्याने बिबट्याचा पिंपळगावात वावर होता. काही लोकांना रात्रीच्या वेळीही हा बिबट्या आढळला होता.





