बारामतीच्याही पुढे विकास नेण्याची संधी -नागरी सत्कारात नाना पटोलेंचे प्रतिपादन
40 वर्षातील राजकारणात जे बघितले नाही ते 4 आठवड्यात बघायला मिळाले-प्रफुल पटेल
गोंदिया,दि.८ : आजपर्यंतचे राज्याच्या विकासाचे राजकारण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भोवती फिरत होते. मात्र आता आपल्याकडे संधी चालून आली आहे. ज्या महाराष्ट्राची सुरुवात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यापासून होते. त्या जिल्ह्यांनाही आता विकासाची वाट दिसू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल तसेच भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी आता एकत्र येवून आपला क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील प्रत्येक गावांच्या विकासाचा आराखडा तयार करावा, माझ्या रुपाने विधानसभा अध्यक्षपद या जिल्ह्यांना मिळाले आहे. त्या संधीचे सोने करण्याची आणि मातृभूमी व जन्मभूमीतील जनतेचे ऋण फेडण्याची आता वेळ आल्याचे विचार महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले.भंडारा, गोंदिया जिल्हा नागरी सत्कार समितीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार येथील सुभाष शाळेच्या आवारात आज(दि. ८) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा. प्रफुल पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच नवनिर्वाचित आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहेसराम कोरेटे, नरेंद्र भोंडेकर, विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, राजू कारेमोरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. व्यासपिठावर माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी जि.प.अध्यक्ष टोलसिंह पवार, के. आर. शेंडे,माजी मंत्री नाना पंचबुद्धे, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, आरपीआयचे अध्यक्ष संदीप गवई,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,भंडारा जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,रविकांत बोपचे,न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,पी.जी.कटरे, यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. 
पुढे बाेलताना विधानसभाध्यक्ष पटोले म्हणाले की, राजकीय हेवेदावे आणि पक्षभेदाभेद विसरून या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र यावे. मी जे शक्य होईल ते करण्याकरिता प्रयत्नशील असणार आहे. या जिल्ह्यांतील सिंचन, रोजगार, शेती, उद्योग यांच्या विकासाकरिता नेहमी सोबतीला असणार आहे. आजपर्यंत आम्ही बारामती विकासात पुढे आहे, असे ऐकिवात होते. मात्र आज या मंचावर सर्वपक्षिय आमदार एकत्र आले आहेत. अशीच एकी विकासाकरिता ठेवावी. नक्कीच येणाऱ्या काळात गोंदिया आणि भंडारा जिल्हे बारामतीच्याही पुढे जातील, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला.सोबतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट असून त्यांना शेतकरी कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचा असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीचा उपयोग या दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी करवून घेण्यासाठी गावविकासाचे नियोजन सादर करावे असे सांगत आपण विधानसभेतील हेडमास्तर असलो तरी आपले सर्वांचे हेडमास्तर मात्र प्रफुल पटेलच असल्याचा टोला हाणला. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे पाणी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील ९ तालुक्यात पोहोचणार असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात सिचंनाची व्यवस्था मोठया प्रमाणात निर्माण होवून जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे. बेरोजगारीवर देखील सिंचन सुविधेमुळे मात करता येईल. दोन्ही जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या व्यवस्थेवर आपला भर राहणार आहे. धान उत्पादक शेतक?्यांना धान खरेदीचे पैसे दोन दिवसात देण्याची व्यवस्था करण्यात येईल. आवश्यकता असल्यास दोन्ही जिल्हयात आणखी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.
राजकारण विसरून एकत्र येवूया : पटेल
आजपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात केवळ राजकीय हेव्यादाव्यांपोटी अनेक विकासाच्या योजना रखडल्या. मात्र आज नागरी सत्कार समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय नेतेमंडळी एकत्र आली आहे. त्यामुळे पुढचे विकासाच्या राजकारणाला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झाल्याचे म्हटल्यास अतिश्योक्ती ठरणार नाही. हा पायंडा असाच अविरत सुरू राहावा. दोन्ही जिल्हे धान उत्पादक आहेत. शेतकऱ्यांना आता त्यापासून आधुनिक शेतीची कास धरून फळबागांकडे वळावे लागेल. त्याकरिता लागणारी मदत आणि साधन सामुग्री पुरविण्याकरिता आम्हाला प्रयत्न करावे लागतील. नाना पटोले म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव आहे. शेतकऱ्याच्या घरी जन्मून ते आज विधानसभेच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. दोन्ही जिल्ह्यांना न्याय देण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांनी आता संधीचे सोने करावे. आमदारांनी देखील या सत्कार समारंभात फक्त मोमेंटे घेवून चालणार नाही. राजकारण बाजूला सारून एकत्र यावे. तुम्ही राज्यातून निधी आणा, मी केंद्रातून मंजूरी मिळवून आणतो असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
सोबतच जे आपल्या 40 वर्षाच्या राजकारणात बघितले नाही,ते बघण्याची संधी सत्ता स्थापनेच्या कार्यकाळातील 4 आठवड्यात बघायला मिळाल्याचे सांगत.कुठे राष्ट्रवादीची विचारधार,कुठे शिवसेना अनं काँग्रेस कुठे याचा अंदाजही बांधायला गेल्यावर या तिघांची सत्ता अनाकलनीयच वाटते.परंतु ही सत्ता जोपर्यंत शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत विश्वासाने चालेल चिंता करायची गरज नसल्याचेही म्हणाले.पटेल पुढे म्हणाले, धापेवाडासारखे आणखी काही बंधारे जिल्ह्यात बांधण्यात येतील. त्या बंधाèयातील पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी झाला पाहिजे. शेतकèयांनी आता धानासोबतच अन्य पिकांकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा वापर अन्य पिकांसाठी केला तर जिल्ह्याचे चित्र बदलण्यास मदत होईल. जिल्हयातील शेतक?्यांना आज दिशा देण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा हातभार लागला तर जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदललेले दिसेल. आणि हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत अग्रेसर झालेली दिसतील, असे त्यांनी सांगितले.
आमदारांनीही दाखविली इच्छाशक्ती
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, आज आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी मिळून जिल्हयाच्या विकासात हातभार लावला तर दोन्ही जिल्हे विकासात अग्रेसर असतील. प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणर आहे. जिल्ह्यातील शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. प्र फुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे निश्चितच आपले योगदान देतील. सर्वांच्या प्रेमामुळे मला विधानसभेत जाण्याची संधी इथल्या मतदारांनी दिली आहे. त्यांचे ऋण या पाच वर्षात विकास कामाच्या माध्यमातून फेडण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, दोन्ही त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खा. प्रफुल पटेल व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे अधिक गती मिळणार आहे. जिल्हयातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आता आम्हाला थेट नानाभाऊंकडे जाता येईल. विधानसभेत दोन्ही जिल्हयाचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जिल्हयाच्या विकासाला निश्चित गती देवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार मनोहर चंद्रीकापूरे म्हणाले, अर्जुनी मोरगाव तालुक्याला सिंचनातून समृध्द करण्यात इटियाडोह प्रकल्पाचा महत्वाचा वाटा आहे. इटियाडोहचे कालवे ७० किलोमीटरपर्यंत आहे हे कालवे सिमेंटचे झाले तर या प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होणार नाही. या पाण्याचा पुरेपूर वापर सिंचनासाठी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला नाना पटोले अध्यक्षृपदावरून न्याय देतील. चमकणा?्या ता?्यांप्रमाणे नानाभाऊंनी काम करावे. विकास कामांचा मोठा अनुभव खा. प्रफुल पटेल यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे निश्चितच आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. दोन्ही जिल्हयातील प्रश्न सोडविले पाहिजे. विकासाची गंगोत्री जिल्ह्यातील धापेवाडा टप्पा दोनच्या पाण्याच्या माध्यमातून येण्यास मदत होणार असल्यामुळे हे काम लवकर व्हावे. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आमदार विजय रहांगडाले म्हणाले, सर्वपक्षीय सत्कार आज होत आहे, यातून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी आज संकटात आहे. त्याला आधार देण्याचे काम विधानसभेत आमच्या जिल्ह्यातील समस्या मांडून त्या सोडविण्यावर आम्हाला निश्चितच वेळ मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार राजू कारेमोरे म्हणाले, दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वामुळे गती मिळणार आहे. शेती व शेतीवर आधारित उद्योगाला या नेतृत्वामुळे चालना मिळण्यास मदत होणार आहे. धान उत्पादक शेतकरी आज संकटात आहे. शेतक?्यांचे प्रश्न सोडवण्यासोबतच अनेक समस्यांची सोडवणूक करण्यास त्यांची मदत होईल. समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्हाला आता थेट विधानसभा अध्यक्षांकडे जाता येईल. दोन्ही जिल्ह्यातील समस्या त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या सोडविण्यास पुढाकार घेण्यास आम्ही त्यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार सहेसराम कोरोटे म्हणाले, देवरी हा आदिवासी तालुका असून हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे. या तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प असून हा तालुका सिंचनापासून वंचित आहे. आमगाव, सालेकसा व मध्यप्रदेशमध्ये या तालुक्यात असलेल्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडले जाते. परंतु या तालुक्याला सिंचनापासून वंचित राहावे लागते. देवरी मतदारसंघात शेतक?्यांसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास इथला शेतकरी समृध्द होईल असे त्यांनी सांगितले. या तालुक्यात सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासाठी या प्रकल्पांचा तालुक्यातील शेतक?्यांना कसा फायदा होईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा शंभराच्यावर विविध राजकीय, धार्मिक, सामाजिक, व्यापारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी संघटना, जातीय संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन व जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. उपस्थितांचे आभार विनोद जैन यांनी मानले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




