लाखनी,दि.15ः-गावातील संसाधनांची उत्पादकता व पर्यायी रोजगार संधी वाढवून वनावरील अवलंबत्व कमी केल्यास मानव-वन्य प्राणी संघर्ष कमी होऊन सहजीवन प्रस्थापित होण्यास हातभार लाभणार आहे. ह्यासाठी वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामधील ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल मेंढे यांनी केले.ते लाखनी तालुक्यातील खुर्शीपार येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतील लाभार्थ्यांना दुधाळ गायींचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी कलाम शेख, मनीष कापगते, गीतेश टेंभुर्णे, आरएफओ जाधव, सौ.रेखाताई पटले, रामप्रसाद कुंभरे, प्रदिप रहांगडाले, जगदीश खेडीकर, रामभाऊ एकेकर, सौ.वीणाताई सार्वे, सौ.समिताताई भोयर, सौ.आशाताई येरेकर, मोरेश्वर नंदेश्वर, रघुवीर पुराम, हंसराज तेंभुरने तसेच वन विभाग कर्मचारी वर्ग तथा नागरिक उपस्थित होते.
तत्पूर्वी लाखनी तालुक्यातील मुंडीपार येथे याच योजनेअंतर्गत कोका अभयारण्यातर्फे २२० कुटुंबांना जल शुद्धीकरण यंत्राचे वाटप देखील खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे हि काळाची गरज आहे, हि गरज लक्षात घेऊन भंडारा गोंदिया जिल्ह्यातील अशा संरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करण्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार मेंढे पुढे म्हणाले. गावनिहाय सूक्ष्म नियोजन आराखडा (micro-plan) तयार करून गावांचा परिस्थिती नुसार विकास साधण्यासाठी शासनाच्या संबंधित सर्व विभागांच्या योजनेतील तरतुदींची सांगड घालून एकात्मिक व नियोजनबद्धरित्या विकास घडविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मेंढे म्हणाले.





