भंडारा,दि.19ः-विविध साहित्यांच्या खरेदी प्रकरणात अनियमितता केल्याने भंडारा सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आर.एम. विधाते यांना निलंबित करण्यात आले आहे.सामाजिक वनीकरण विभागात विविध साहित्यांची खरेदी केली जाते. नर्सरी मॅट, ग्रीन नेट, बकेट, खते व अन्य साहित्यांचा त्यात समावेश असतो. या साहित्यांच्या खरेदीत कुटुंबियांच्या नावांचे बिल जोडण्यात आले. याबाबतची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. चौकशीअंती खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले होते.
विभागीय वन अधिकारी आर.एम. विधाते यांच्याविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे व वरिष्ठांची दिशाभूल करणे याअनुषंगाने विभागीय चौकशीची कारवाई प्रलंबित आहे. विभागातील अनियमितता निदर्शनास आल्याने त्यांना शासनसेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे कार्यालय मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) नागपूर यांचे कार्यालय राहणार आहे. तसेच त्यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. शासनाच्या या कारवाईमुळे वनअधिकार्यांच्या वरिष्ठ लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे.





