भंडारा,दि.25ः-टुरीझम सर्किटचा महत्वाचा भाग असणार्या पवनी येथील किल्ल्याची खा. सुनील मेंढे यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी अलोनी, अंगाइतकर, तहसीलदार काकोर्डे, भुमी अभिलेख विभागीय अधिकारी, मुख्याधिकारी ढाके व किल्लेप्रेमी हजर होते. पर्यटन वाढीसाठी सद्यस्थिती तसेच आगामी काळात आणखी काय उपयोजना करता येतील याचा अभ्यास करण्याच्या हा हेतू होता.
यावेळी खा. मेंढे म्हणाले, पवनी किल्ल्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. तसेच पवनी शहर हे भारतातील सर्वाधिक पुरातन शहर म्हणून ओळखले जाते. शहरात अनेक पुरातन मंदिरे तसेच नदीचे घाट देखील आहेत. किल्ल्याची वास्तू ही संरक्षित असून त्याच्या पर्यटनवाढीला भरपूर वाव आहे. त्याचप्रमाणे पवनी शहराच्या आसपास अशा पर्यटन वाढीला पूरक ठिकाणांचा अभ्यास करून एक विस्तृत पर्यटन विकास आराखडा तयार करणार असून त्यामध्ये स्थानिकांना मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. कालबद्ध रीतीने पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांची संपर्क सुरु आहे. स्थानिक प्रशासनाला देखील यामध्ये सहभागी करून घेणार असल्याची माहिती खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी दिली.यावेळी अनिल मेंढे, राजेंद्र फुलबांधे, अमोल तलवारे, मयुर रेवतकर, दिपक तिघरे, दिंगाबर वंजारी, सचिन शहारे, शंकुल शहारे, महेश फुंडे, मश्चींद्र हटवार, संदिप सर्मथ तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते.





