25.6 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ अवकाळी पावसांमुळे धान केंद्राबाहेरील पोत्यातील धानाला फुटले अंकुर

अवकाळी पावसांमुळे धान केंद्राबाहेरील पोत्यातील धानाला फुटले अंकुर

0
44

भंडारा/गोंदिया,दि.02ः- जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शासकीय खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाच्या पोत्यांमध्ये पाणी शिरुन धान अंकुरले आहेत. त्यामुळे भिजलेले व अंकुरलेले धान घेण्यास केंद्रावर नकार दिला जात आहे. निसर्गाचा फटका आणि खरेदी केंद्रावरील या मनमानी कारभारामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.त्यातच आज गुुरुवारला सकाळपासूनच पावसाने रिमझिम सुरु केल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
दोन्ही जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळातर्फे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रावर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आले आहे. नियोजन नसल्याने अनेक दिवस धानाची मोजणी होत नाही. त्यामुळे धान भिजत आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत आलेल्या पावसाने पोत्यातून जमिनीवर सांडलेले धान अंकुरले आहेत. मोठय़ा कष्टाने पिकविलेल्या धानाची होत असलेली नासाडी पाहून शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप आहे.
सध्या खुल्या बाजारात बारीक धानाला दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. तर शासकीय धान केंद्रावर बोनससह २५00 रुपये भाव जाहीर झाल्याने शासकीय केंद्रावर ठोकळ धानासह बारीक धानाची आवक वाढली आहे. अशातच धान्य ठेवण्यासाठी योग्य व समतल जागा मिळत नसल्याने मिळेल त्या जागेवर पोती ठेवली जात आहेत. कधी बारदाना संपल्याने तर कधी नैसर्गिक कारणांमुळे केंद्र बंद राहून धान खरेदीला विलंब होत आहे. १५ दिवसांपासून शेतकर्‍यांचे धान खरेदीविना उघड्यावर पडून आहेत. पोती झाकण्यासाठी साधी ताडपत्री दिली जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड दैना सुरू आहे.
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाची संततधार बुधवारी सकाळीसुद्धा कायम होती. या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेले धान पाण्यात भिजून धान अंकुरले आहेत. आता ओले व अंकुरलेले धान खरेदी करण्यास केंद्रावर मनाई केली जात असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. खरेदी केंद्रावरील धान तात्काळ खरेदी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दोन दिवसापासून सूर्यदेवाचे दर्शन झाले नसल्याने ढगाळ व धुकेयुक्त वातावरणामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. खरीप हंगामात धान उत्पादन घेतल्यावर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोरी, वाटाणा, करडई, भूईमूग, आदी कडधान्ययुक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व पावसामुळे या पिकांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून या हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.
गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे धान हमीभाव खरेदी केंद्रावर उघड्यावर पडलेले आहेत. केंद्रावर पावसापासून धानाच्या पोत्यांचे बचाव करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाही. तर शेतकरी आपले धान वाचविण्याचे प्रयत्न करीत असले तरी जोरदार व गारपीट झाल्यास केंद्रावरील धानाचे मोठे नुकसान होणार आहे. गत काही दिवसातील अवकाळी पाऊस व धान खरेदी केंद्रावरील समस्या समोर येऊनही शासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा रोष शेतकर्‍यांमध्ये व्यक्त केला जात आहे.