सालेकसा : तालुक्यातील सावंगी ते साकरीटोला मार्गावर ३१ डिसेंबर रोजी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉली रेतीसह जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार मधूकर माणिकराव कृपाण हे आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंगवर असताना सावंगी ते साकरीटोला दरम्यान एमएच ३५/जी ३७६२ क्रमांकाचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाची ट्रॉली अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळली. पोलिसांनी रेतीसह ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
देवरी : तालुक्यातील कासा येथील जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोशनी राकेश वैष्णव (३२ रा. वॉर्ड क्र., देवरी) असे मृत महिलेचे नाव आहे. २२ नोव्हेंबर रोजी कासा येथे ती जळली होती. नागपूर येथील मेयो हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना २२ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी पोलीस हवालदार औरासे यांच्या तक्रारीवरुन देवरी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शाळेतून साहित्य लंपास
गोरेगाव : तालुक्यातील हिरडामाली येथे ३१ डिसेंबर रोजी शाळेतून साहित्य चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. हिरडामाली येथील भारतर% अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मुख्याध्यापिकाच्या कक्षाचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ५ नग व्हॉलीबॉल, क्राफ्ट साहित्य, होम थियेटर, व्हॉलीबॉल नेट, ४ बॅड०मटन रॅकेट, २ लोखंडी गोळे असे एकूण ११ हजाराचे चोरुन नेले. फियार्दी नाननबाई रुपचंद बिसेन यांच्या तक्रारीवरुन गोरेगाव पोलीसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गणवीर करीत आहेत.
क्षुल्लक कारणातून चाकूने मारले
गोंदिया : तालुक्यातील मोहरानटोली (नागरा) येथे फियार्दी विजय उत्तम गिरी हा गावातीलच आरोपीच्या घरी जिन्स पँट मागण्याकरिता गेला असता आरोपीने जिन्स पँट देण्यास नकार दिला व फियार्दीच्या पाठीवर चाकूने मारुन जखमी केल्याची घटना सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैद्यकीय अहवालानुसार व फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
फूस लावून पळवून नेले
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
बाजार समितीच्या कार्यालयात चोरी
गोंदिया : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयील कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सुरेश शाममुरारी जोशी यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.





