गोंदिया, दि.03:: राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 27 डिसेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 जाहीर केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी काही मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत.या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामधील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे कर्ज खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती-2019 योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याशी आधार क्रमांक संलग्न करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेकडे अद्याप नोंदविला नसेल अशा शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक आपले बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणि मोबाईल क्रमांक आपले कर्जखाते असलेल्या बँकेच्या शाखा, विकास सेवा सहकारी संस्थेकडे त्वरित नोंदवून आपल्या कर्जखात्याशी संलग्न करुन घ्यावा, जेणेकरुन संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ तात्काळ देणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नविन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, खोली क्र.46, जयस्तंभ चौक, गोंदिया या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकानी कर्जखात्याला आधार जोडणी संलग्न नसलेल्या कर्जखातेधारक शेतकऱ्यांची मराठी भाषेतील यादी तयार करुन 7 जानेवारीपूर्वी संबंधित बँकांनी पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक प्राप्त करण्याची कार्यवाही करावी.योजनेची शिघ्रगतीने अंमलबजावणीसाठी कर्ज खातेदाराचा तपशील पडताळून ज्या कर्ज खात्याला आधार जोडणी झालेली नाही अशा कर्जदारांची यादी मराठीमध्ये तयार करावी व सदर यादी बँक शाखेच्या, विकास संस्थेच्या तसेच अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिध्द करुन शेतकऱ्यांना आधार जोडणी करण्याबाबत आवाहन करावे. ही कार्यवाही 7 जानेवारीपूर्वी पुर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना आपले सहकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणित करण्यासाठी सेवा मुक्त (नि:शुल्क) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपले सहकार सेवा केंद्रावर कोणत्याही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येवू नये असे शासनाचे निर्देश आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना-2019 चा लाभ देण्यासाठी बँकांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व शासनास त्यांचा त्वरित तपशिल सादर करावा. आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेच्या संदर्भात माहिती प्राप्त करुन लाभ घेण्यासाठीही तत्परता दाखवावी लागणार आहे. नोडल अधिकारी यांनी सुध्दा या योजनेचा अभ्यास करुन जबाबदारीने आपले कामकाज पार पाडावे, असे जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी कळविले आहे.





