26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ सरपंचावर अविश्वास आणणार्‍या सदस्यांविरोधात गावकर्‍यांचा एल्गार

सरपंचावर अविश्वास आणणार्‍या सदस्यांविरोधात गावकर्‍यांचा एल्गार

0
36

आमगाव(पराग कटरे)दि.03: सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाही त्यामुळे गावाचा विकास होत नाही. या कारणास्तव सरपंचावर अविश्वास दर्शवून त्यांना पायउतार करण्यात येते. मात्र, पायउतार झाल्यानंतर त्या सरपंचाच्या पाठीशी जिल्ह्यात तरी ग्रामस्थ कधी एकवटल्याचे पहावयास मिळाले नाही. परंतु तालुक्यातील किकरीपार येथील सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारीत झाल्यानंतर त्या सरपंचाच्या बाजूने ग्रामवासी एकवटले. एवढेच नव्हेतर ते प्रस्ताव निरस्त करून पुर्ववत सरपंचाला कायम ठेवावे, या मागणीसाठी किकरीपार ग्रामवासीयांनी एल्गार पुकारून ग्राम पंचायतीला चक्क कुलूप ठोकले.

सविस्तर असे की, तालुक्यातील किकरीपार ग्राम पंचायतमध्ये ७ ग्राम पंचायत सदस्यांनी सरपंच कविता मेंढे ह्या सदस्यांना विश्वासात न घेता विकासकामे करीत असल्याचा आरोप करून अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल केला होता. यावर १ जानेवारी रोजी ग्राम पंचायतीच्या सभागृहात तहसीदारांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दोन विरूध्द सातच्या फरकाने सरपंचाविरूध्द अविश्वास प्रस्ताव पारीत करण्यात आले. हा प्रकार गावकर्‍यांना नडला. दरम्यान सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव चुकीचा आहे, अशी बाजू धरीत गावकर्‍यांनी चक्क सरपंच कविता मेंढे यांच्या पाठीशी उभे राहून एल्गार पुकारला. विशेष म्हणजे, सरपंचानी सदस्यांच्या आमिषाला बळी न पडता गावात चांगली कामे केल्याने सरपंच मेंढे यांना कायम ठेवण्यात यावे, या मागणीला घेवून ग्रामस्थांनी चक्क ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अविश्वास प्रस्ताव पारीत झाल्याने नियमानुसार सरपंचाना पायउतार व्हावे लागणार आहे. तर दुसरीकडे हा प्रस्ताव निरस्त करून सरपंचाला पदावर कायम ठेवावे, यासाठी ग्रामस्थ सरसावल्याने प्रशासन हा तंटा कसा सोडविणार? याकडे तालुक्याचेच नव्हेतर तर जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.