32.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ पदाचा उपयोग जनतेच्या विकासाकरीता करणार – नाना पटोले

पदाचा उपयोग जनतेच्या विकासाकरीता करणार – नाना पटोले

0
27

Ø पूरक नळ योजनेच्या जलकुंभाचे भूमीपूजन

भंडारा,दि 4:- जनतेच्या माध्यमातून मिळालेल्या पदाचा फायदा हा जनतेच्या सर्वांगिण विकासाकरीता व्हायला पाहिजे. या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडविल्यानंतरच ही समस्या मार्गी लागेल. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु केलेले आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ग्राम पळसगाव येथे आयोजित जलकुंभ भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, तहसिलदार बाळासाहेब तेळे, उपविभागीय अभियंता प्रेम सावरकर, शाखा अभियंता हर्षल गणवीर, जिल्हा परिषद सदस्य  दिपक मेंढे, होमराज कापगते, पंचायत समितीच्या उपसभापती वर्षाताई कापगते, पंचायत समिती सदस्य लालचंद लेथे, सरपंच मंगला खोटेले, उपसरपंच प्रकाश बागळे, अशोक भंडारकर,  प्रेमलाल कोरे, सविता ब्राम्हणकर, अंजीरा चुटे, शंकर ब्राम्हणकर आदी उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनेपासून वंचित असलेले वनजमीन अतिक्रमित असलेल्या शेतकऱ्यांना वनजमीनीचे पट्टे मिळावे व सातबारावर मालकी हक्क मिळावा या करीता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे तसेच बेरोजगारांचे प्रश्न, व्यवसायाकरीता योजना आराखडा तयार करुन ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी, बेरोजगार युवकांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पळसगाव/सो पूरक नळ योजनेच्या जलकुंभाचे भूमीपूजन पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. याचा अंदाजपत्रकीय खर्च 94 लक्ष 11 हजार 795 असून साठवण क्षमता 1 लक्ष लिटर इतकी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रकाश बागळे यांनी केले तर आभार प्रेमलाल कोरे यांनी मानले. या प्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.