34.3 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home महाराष्ट्र ‘सामान्य नागरिक असो की शेतकरी, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे’; बच्चू कडूंचा...

‘सामान्य नागरिक असो की शेतकरी, मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे’; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

0
33

मुंबई,दि.05- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर एक शेतकरी आपल्या मुलीसह आले होते. पण, यावेळी पोलिसांनी या शेतकऱ्यासोबत अरेरावी करत, मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. यावर बोलताना मंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, ‘शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे,’ असे म्हणत बच्चू कडूंनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. तसेच, ‘प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करत अशी वेळ परत आल्यास मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेल,’ असेही बच्चू कडू म्हणाले.

खाते वाटपाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ”सामाजिक न्याय खाते मिळाले असते तर अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी कोण करत नाही. मात्र आम्ही ते मागितले होते. त्यामाध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लागले असते. पण, खातं कुठलंही असो, मी त्यात काम करत राहील.”

”मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जलसंपदाही अत्यंत महत्त्वाचे खाते आहे, विदर्भात त्याची गरज आहे. महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लाग आहे. त्यासाठी पाणी नियोजन करू, भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करू. चांगले अधिकारी असतील त्यांना खांद्यावर घेऊ. मात्र विनाकारण त्रास दिला तर बच्चू कडू मंत्री आहे हे विसरून जाणार,” असा इशारा बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना दिला.

पनवेल येथील शेतकरी आपल्या लहान मुलीसोबत मातोश्रीवर दाखल झाला होता. त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचा कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. तरीसुद्धा बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाल्याचे समजते. यानंतर पोलिसांनी शेतकरी आणि त्याच्या सात वर्षीय मुलीला ताब्यात घेतले होते. दरम्यान मातोश्रीवर आलेल्या या शेतकऱ्याला पोलिसांना सोडण्यास सांगितले आहे , तसेच त्याचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे.