गोंदिया,दि.7 – देवरी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात सुरू असलेल्या एका फौजदारी प्रकरणामध्ये जुगाराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला आज मंगळवारी न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सविस्तर असे की, देवरी पोलिस स्टेशनला गेल्या 2 जानेवारी 2019 रोजी तालुक्यातील भागी तलावाच्या खाली काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चार इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले होते. या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक न्यायालयात या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, यातील तीन आरोपींनी आपला गुन्हा माननीय न्यायालयासमोर कबूल केल्याने त्यांना प्रत्येकी 300 रुपये दंड किंवा दंड न भरल्यास 7 दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या चार आरोपींपैकी अकबर हसन शेख (वय 42) राहणार देवरी हा सदर प्रकरणी फरारी असल्याने त्याचे विरुद्ध देवरी पोलिसांनी वेगळा दोषारोप पत्र न्यायालयात सादर केला होता.
या प्रकरणात न्यायाधीस शेख मोहम्मद वसीम अक्रम मोहम्मद जलालुद्दीन यांनी आरोपीला आज मंगळवारी (दि.7) दोषी आढळल्याने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नायक निताराम बोहरे यांनी केला होता. सदर प्रकरणात मध्ये एका वर्षाच्या आत न्यायालयापुढे आरोप सिद्ध करण्यात यश आल्याने देवरी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात असून गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहे.




