भंडारा,दि.08ः- जवळच्या जाख येथील आमराईत एका २३ वर्षीय तरुणीचा खून करुन तिचा मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. अश्विनी भाऊराव ठोंबरे रा. धानला ता. मौदा जि. नागपूर असे मृत तरूणीचे नाव असून प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारी रोजी अश्विनीचे लग्न होणार होते. दरम्यान, अश्विनीच्या मृत्युची बातमी कळताच तिच्या ७८ वर्षीय आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
मौदा तालुक्यातील धानला येथील भाऊराव ठोंबरे यांची मुलगी अश्विनी ही मौदा येथील डी.डी.भोयर महाविद्यालयात बीएसस्सी तृतीय वर्षाला शिकत होती. कामठी तालुक्यातील भिलगाव येथील एका तरूणाशी तिचा विवाह ४ फेब्रुवारी रोजी होणार होता. मात्र सोमवारी (दि.६) राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जाख गावपरिसरात अश्विनीचा खून करुन तिचा मृतदेह फेकण्यात आला. भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. वृत्त लिहेपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नसला तरी आरोपी मारोडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रेमप्रकरणातून तिचा खून केल्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. भंडारा पोलिसांनी घटनेची माहिती अश्विनीच्या कुटुंबियांना दिली. तिचा मृत्यू झाल्याचे कळताच तिची ७८ वर्षीय आजी सिताबाई र्शावण ठोंबरे हीचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू झाला. घटनेचा तपास भंडारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जटाळ करीत आहेत.




