नागपूर,दि.16 : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख अंजली महाजन यांच्यावर सहकारी कर्मचारी महिलेने अमोनिया अॅसिडने हल्ला केला. अमोनिया अॅसिड हे कमी ज्वलनशील रसायन असल्याने व महाजन यांनी प्रसंगावधान बाळगल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.महाजन यांच्यामुळे आपले खूप नुकसान झाल्याची भावना शेंडे यांच्या मनात होती. यामुळे महाजन यांना संपवण्याची त्यांनी योजना आखली होती. मंगळवारी सायंकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जात असताना त्यांनी महाजन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून त्या सावध होत्या व आज दुपारी त्या कक्षात येताच स्वत:चा बचाव करू शकल्या, अशी माहिती समोर येत आहे.
नीलिमा शेंडे असे अॅसिड फेकणाऱ्या महिलेचे नाव आहे. नीलिमा शेंडे या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. गेल्या महिन्यापर्यंत त्या महाजन यांच्याच विभागात कार्यरत होत्या. पण, वर्षभर त्या नियमित सुट्टय़ा घेत. त्यामुळे महाजन यांना इतर प्रयोगशाळेच्या सहाय्यकांची मदत घ्यावी लागे. दरम्यान, महाजन यांनी शेंडे यांचा गैरहजरीचा अहवाल प्राचार्याना सादर केला. त्यामुळे डिसेंबर २०१९ या महिन्याचे वेतन शेंडे यांना मिळू शकले नाही. याचा राग त्यांच्या मनात होता. शिवाय शेंडे कौटुंबिक समस्यांमुळेदेखील तणावात होत्या. सहा डिसेंबरला त्यांची बदली रसायनशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. या तणावात त्या एका चंचूपात्रात अमोनिया अॅसिड घेऊन दुपारी १२ वाजता महाजन यांच्या कक्षात पोहोचल्या. त्या दारावर पोहोचताच महाजन यांना संशय आला. शेंडे यांनी चंचूपात्रातील अॅसिड महाजन यांच्यावर फेकले. त्यांनी वेळीच आपली ओढणी समोर केली. अमोनिया अॅसिड हा कमी ज्वलनशील असल्याने त्यांना कोणतीच इजा झाली नाही. परंतु त्या किंचाळल्याने कर्मचारी मदतीसाठी धावले व शेंडे यांना पकडून दुसऱ्या खोलीत बसवले. माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतली. प्राचार्याच्या खोलीत सर्वानी चर्चा केली. पण, शेंडे या आपल्या घरात एकटय़ाच कमावत्या असून त्यांची तक्रार केली तर नोकरी जाण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे महाजन यांनी शेंडे यांची तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती दिली. या वृत्ताला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी दुजोरा दिला.




