सडक अर्जुनी, ता. २१ ः वनविभागाने सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून, सागवानासह बोलेरो पीकअप वाहन जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २०) पहाटे चारच्या सुमारास सालेधारणी-डोंगरगाव मार्गावर केली.
सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो अंतर्गत बीट डोंगरगाव, पुतळी, सहाकेपार तसेच सहवनक्षेत्र पांढरवाणी बफर अंतर्गत बीट कोयलारी, शेंडा परिसरात सागवान लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार सहवनक्षेत्र डोंगरगाव, पांढरवाणी आणि देवरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त पथक तयार करून पाळत ठेवली. शनिवारी (ता. २०) पहाटे चारच्या सुमारास डोंगरगाव-सालेधारणी मार्गावर संशयास्पदरित्या धावणाऱ्या बोलेरो पीकअप (क्र. एमएच-३५/ ए. जे. ११५४) वाहनाला पथकाने अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सागवान प्रजातीचे लाकूड अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर वनविभागाच्या पथकाने वाहनासह त्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या सागवान मालाची मोजणी व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून मालाची किंमत आणि प्रमाणाबाबत अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
ही कारवाई डोंगरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. के. गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरवाणीच्या क्षेत्र सहायक कु. व्ही. बी. रहिले, डोंगरगाव/ खजरीचे क्षेत्र सहायक सी. एस. डोरले, पवन कांबळे, मेहबूब सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसळे, वनिता ब्राह्मणकर, वनरक्षक शालू मेंढे, वनमजूर यशवंत शेंडे, श्रीकांत बन्सोड व समीर बन्सोड यांनी केली.
अशी आहेत आरोपींची नावे
नीलेश हिरालाल मेश्राम (रा. कोयलारी प्रधानटोला, ता.सडक अर्जुनी), ओंकार सहदेव सोनवाने (रा.आलेडन, जि. राजनांदगाव, छत्तीसगढ), खोमन बुधराम लोहार (रा. दिवाणटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगढ).





