चंद्रपूर,दि.१ः जिल्ह्यातील दारूबंदी जीवावर बेतली असून, पतीवर पोलिसांनी खोटा गुन्हा नोंद केल्याने पत्नीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३0 जानेवारी रोजी जिवती पोलिस ठाण्यात घडली.
पीडित महिलेला स्वत: पती आणि नातेवाईकांनी ऑटोने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणले. माणुसकीची जान नसलेल्या भारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि सध्या जिवती पोलीस ठाण्याचे काम पाहत असलेल्या ठाणेदारांनी सदर महिलेची मदत करण्या ऐवजी तुम्हीच दवाखान्यात घेऊन जा, अशी तंबी नातेवाईकांना दिल्याची माहिती महिलेच्या आईंने दिली आहे. ठाणेदाराचे हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ठाणेदारावर कारवाई करावी, अशी मागणी इतरांसह मनसे राजूरा विधानसभा अध्यक्ष महालींग कंठाळे यांनी केली आहे.
विषप्राशन करणार्या महिलेची आई अवैध दारूची विक्री करते. गुप्त माहितीच्या आधारे रात्रीच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून तिच्या घरून दारूसाठा जप्त केला होता. मात्र, महिलेवर गुन्हा दाखल करण्या ऐवजी पोलिसांनी तिच्या जावयावर गुन्हा नोंद केला. दारू माझ्या घरात सापडली, यासाठी माझ्यावर कारवाई करा, यात माझ्या जावयाचा दोष नाही, तो पत्नीसोबत वेगळा राहतो, अशी विनंती सदर महिलेनी ठाणेदाराकडे केली. परंतु, कोणताही प्रतिसाद न देता जावयावरच गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात पतीचा कोणताही सहभाग नसल्यानेसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाहून पत्नीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी ठाणेदार स्वत: हजर होते.मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे महिलेच्या आईंने सांगितले.
घटना काहीही असो, पण माणुसकीच्या नात्याने ठाणेदारांनी मदत करायला हवी होती, अशी चर्चा असून, ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.आता ठाणेदारावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




