गोंदिया,दि.01 – पोलिसांच्या खबरी समजून नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गोंदिया-डोंगरगढ़ (छत्तीसगड) सीमेवरील नवागाव येथे घडली आहे. लालसिंग यादव, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.गोंदिया-राजनांदगाव येथील सीमेवर 3 ऑगस्ट 2019 ला पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत 7 नक्षलवादी मारले गेले होते. पोलिसांना या घटनेची माहिती लालसिंग यादव या शेतकऱ्याने दिल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता. त्यामुळे 29 जानेवारीला रात्री नक्षलवाद्यांनी लालसिंग यादव या शेतकऱ्याची हत्या केली.यावेळी नक्षलवाद्यांनी मृताच्या जवळ पोस्टरसुद्धा लावले असल्याने पोलिसांना ही माहिती मिळाली. मृत लालसिंग यादव हा जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असताना नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.




