40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता युवकाची हत्या करून मृतदेह दुचाकीसह खड्डय़ात पुरला

युवकाची हत्या करून मृतदेह दुचाकीसह खड्डय़ात पुरला

0
38

नागपूर,दि.03ः-भंडारा मार्गावरील कापसी ढाब्यावर सुमारे महिन्याभरापूर्वी एका युवकाचा खून करून त्याला त्याच्या दुचाकीसह दहा फूट खड्डय़ात पुरल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून एक फरार आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट आला होता. त्यातील कथानकाप्रमाणेच या हत्येचा घटनाक्रम आहे. मात्र पोलिसांना माहिती मिळाल्याने प्रकरणाचे बिंग फुटले.

पंकज गिरमकर (३२) रा. बाकरे लेआऊट, समता नगर, सावंगी मेघे, जि. वर्धा असे मृताचे नाव आहे, तर अमरसिंग ऊर्फ लल्लू जोगेन्द्रसिंग ठाकूर (२४) रा. कापसी (ढाबा मालक), मनोज ऊर्फ मुन्ना रामप्रवेश तिवारी (३७) रा. बिहार (स्वयंपाकी), शुभम ऊर्फ तुषार राकेश डोंगरे (२८) इमामवाडा (ढाबा चालक मित्र), भाई जान रा. बालाघाट (वेटर) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे या संपूर्ण प्रकरणाची महिती पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार  पंकज हा हल्दीराम कंपनीच्या कापसी येथील कंपनीत तंत्रज्ञ होता. त्याला पत्नी व एक लहान मुलगा आहे. पूर्वी ते कापसीत राहायचे. त्याच्या पत्नीची कापसीत दोन ढाबे असलेल्या अमरसिंग याच्याशी मैत्री होती. याची माहिती

कळल्यावर पंकजचे अनेकदा अमरसिंगशी वाद झाले. पत्नीची मैत्री तुटत नसल्याने पंकज कुटुंबासह नोव्हेंबर २०१९ मध्ये वर्धेला राहायला गेला. वर्धेतही पत्नी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर अमरसिंगशी चॅटींग करत होती. त्यामुळे पंकज २८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अमरसिंगच्या कापसीतील नवीन ढाब्यावर मोटारसायकलने गेला. अमरसिंगला त्याने पुन्हा त्याच्या पत्नीशी मैत्री तोडून दूर राहण्यास सांगितले. यावेळी दोघांचा वादही झाला. यावेळी अमरसिंगच्या सूचनेवरील ढाब्यावरील नोकर भाईजानने पंकजच्या डोळ्यात  मिरची पूड फेकली व इतरांनी त्याच्या डोक्यावर सब्बल व  लोखंडी सळाखीने वार केले. यात पंकजचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पंकजचा मृतदेह एका लोखंडी ड्रममध्ये ठेवून घटनास्थळावरील रक्ताचे डाग तातडीने पुसण्यात आले. त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून काही तासातच ढाब्यावरील व्यवसाय सुरू केला गेला. रात्री एका जेसीबीने ढाब्याच्या मागे दहा फूट खड्डा खोदून त्यात पंकजचा मृतदेह त्याच्या दुचाकीसह पुरण्यात आला. त्यापूर्वी खड्डय़ात ५० किलो मीठही टाकण्यात आले.दरम्यान, या घटनेची माहिती अज्ञात इसमाने पोलिसांना दिली. त्यांनी खोलवर तपास केल्यावर या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांनी  तीन आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरू असल्याचे भरणे म्हणाले. ही कारवाई गजानन राजमाने, किशोर जाधव, अनिल ताकसांडे यांच्यासह चमूने केली. तपासात इतर काही आरोपी समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.

दिशाभूल करण्यासाठी मोबाईल ट्रकमध्ये फेकला

पंकज हरवल्याची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात दिली गेली होती. पंकजच्या मोबाईलचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून आरोपींनी त्याचा मोबाईल घटनेनंतर एका ट्रकमध्ये टाकून दिला. हा ट्रक राजस्थानला गेल्यावर तेथे पंकजच्या मोबाईलचे लोकेशन दाखवले जात होते. दरम्यान, बॅटरी संपल्याने मोबाईल बंद झाल्यावर हे लोकेशनही बंद झाले.

स्वच्छता गृहाच्या नावाने खड्डा खणला

आरोपीने ढाब्याच्या मागे स्वच्छतागृह बांधायचे आहे असे सांगून जेसीबी चालकाला बोलावले व दहा फूट खड्डा खोदला. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास पंकजचा मृतदेह त्याच्या दुचाकी वाहनासह खड्डय़ात पुरला. त्यानंतर थोडी माती त्यात टाकली गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा या खड्डय़ाने ढाब्याचे पिल्लर हलत असल्याने वडील रागवतील असे सांगत जेसीबी चालकाला बोलावून पुन्हा मातीने खड्डा बुजवला. दोन्ही वेळेला जेसीबी चालकाला प्रत्येकी ९०० रुपये भाडे दिल्याचेही प्राथमिक तपासात पुढे आले आहे.