सडक अर्जुनी(भामा चुर्हे)दि.१९ः- तालुक्यातील सौंदड येथील राईस मील मालकांनी ट्रक चालकांवर तांदूळ अफरातफरीचा आरोप करीत बेदम मारहाण केल्याची घटना १२ मार्च रोजी घडली. याप्रकरणीत डुग्गीपार पोलीसांनी दखलपात्र गुन्हा असल्याने न्यायालयात दाद मागण्याची सूचना करुन गुन्हा दाखल केला आहे.
सौंदड येथील रामदेव बाबा राइस मीलमध्ये देवराम माणिक चांदेवार व संजय कृष्णा मेर्शाम हे ट्रकचालक म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे ते १२ मार्च रोजी सायंकाळी राइस मीलमध्ये गेले. यावेळी राईस मीलचे निकेश लोहिया यांनी त्यांना आपल्या कॅबीनमध्ये बोलविले व तांदळाची अफरातफर केल्याचा आरोप केला. तसेच गुन्हा केल्याचे लेखी लिहू देण्यास सांगितले. मात्र, देवराम व संजयने त्याला नकार दिला असता निकेशसह राकेश लोहिया, सचिन लोहिया व शुभम मोदी यांनी त्यांना लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण केली.
तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास किंवा पोलीसात तक्रार केल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. रात्री १0 वाजता देवराम व संजय आपल्या घरी आले.
दुसर्या दिवशी ते कामावर न आल्याने राईस मील मालक त्याच्या घरी गेले व ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक गोळा झाले. घटनेचा संपूर्ण वृत्तांत देवराम व संजयकडून कळल्यावर जवळपास ५0 नागरिकांसह देवराम व संजयने डुग्गीपार पोलीसात तक्रार केली. मात्र, पोलीसांनी दखलपात्र गुन्हा असल्याने न्यायालयात दाद मागण्याची सूचना करुन गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापही राइस मील मालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही नागरिकांद्वारे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.





