नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.26 : : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील जनगणना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असल्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरु होणा-या २०२१ च्या जनगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
देशभरात जणगणनेची प्रक्रिया सुरु होऊन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, आता यातील पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यान जनतेला विविध प्रकारचे ३१ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. रजिस्ट्रार जनरल अथवा जणगणना आयुक्तांनी याची अधिसूचना काढली होती.दरम्यान, देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर केला जाईल, असे अमित शाह यांनी जाहीर केले आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे, असे दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले. म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.




