26.9 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या मेडिकल स्टाफचा विमा उतरवणार! आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या मेडिकल स्टाफचा विमा उतरवणार! आरोग्य मंत्री राजेश टोपे

0
164

मुंबई,दि.27 – कोरोना व्हायरसच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या मेडिकल स्टाफचा आता विमा उतरवला जाणार आहे. राज्य सरकार अशा मेडिकल स्टाफचा आरोग्य विमा काढण्याचा विचार करत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. एवढेच नव्हे, तर कोरोना विरोधात सैनिकांप्रमाणे लढणारे डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफला इंसेंटिव्ह देण्याची योजना सुद्धा तयार केली जात आहे असे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 147 झाला आहे. विदर्भात कोरोना व्हायरसचे 5 नवीन रुग्ण सापडल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. यानंतर सांगलीतील इस्लामपूर येथे कोरोनाचे 12 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाब अतिशय चिंताजनक आहे. तत्पूर्वी गुरुवारी रात्रीपर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 130 झाली होती. एकाच दिवसात गुरुवारी 8 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउनचा आजचा चौथा दिवस असून ठिक-ठिकाणी लोक अंतर ठेवूनच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना दिसून आले.

राज्यातील 19 रुग्णांनी ठणठणीत होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला

दरम्यान, राज्यात एकूण 4228 संशयितांची चाचणी झाली. त्यापैकी 4,017 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 19 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. राज्यातील विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव परदेशातून येणाऱ्या रुग्णांपासून होणे कमी होत आहे. आता संक्रमित झालेल्यांवर उपचार कसे करावे आणि त्यांना बरे करून घरी कसे पाठवावे यावर सरकार भर देत आहे. यासोबतच, कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

डॉक्टरांनी सेवा बंद केल्यास रुग्णांनी कुठे जावे?

कोरोना व्हायरस रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. यासोबतच, काही खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक आणि सामान्य आरोग्य सेवा बंद केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. कोरोनाच्या भीतीने त्यांनी सामान्य आरोग्य सेवा देणे सुद्धा बंद केले आहे. केवळ ओपीडीच नव्हे, तर आपातकालीन सेवा सुद्धा त्यांनी बंद केल्या आहेत. अशा खासगी डॉक्टरांनी कृपया आपल्या सेवा सुरूच ठेवाव्यात असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.खासगी डॉक्टरांची ही वागणूक चुकीची आहे. कुठलाही आजार झाल्यास रुग्णांनी कुठे जावे? एखाद्या गर्भवती महिलेची डिलिव्हरी होणार असेल तर त्यांनी कुठे जावे? एखाद्याला हार्ट अटॅक आल्यावर त्यांनी कुणाची मदत घ्यावी? वैद्यकीय सेवा ही एक पवित्र सेवा आहे. त्यामुळे, ती बंद करता कामा नये. संकटाच्या काळात रुग्णांना असंवेदनशीलता दाखवू नका.