31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ लॉकडाऊनच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग मार्गदर्शकांना रेशन वाटप

लॉकडाऊनच्या काळात व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग मार्गदर्शकांना रेशन वाटप

0
254

 गोंदिया, दि.21 : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होत आहे. सद्यस्थिती देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु असून कोराना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे फार वेगाने वाढत चाललेली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 30 एप्रिल 2020 पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी तात्पुरता बंद आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगामाकरीता निसर्ग मार्गदर्शक कार्यरत आहेत. मात्र सद्यस्थितीत देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे व व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटन बंद झाल्यामुळे त्यांचा ऐन हंगामात एकंदरीत दिड महिन्यापासून उपजिविकेचा रोजगार बुडाला आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानद्वारे या व्याघ्र प्रकल्पात कार्यरत निसर्ग मार्गदर्शकांना एक महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले.

तसेच हिरवळ बहुउद्देशीय संस्था गोंदिया, वाईल्ड वॉच संस्था भंडारा व डॉ.राजेंद्र जैन गोंदिया यांचेमार्फत सुध्दा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कार्यरत निसर्ग मार्गदर्शकांना मदत देण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्यातील नेचर वॉक चॅरिटेबल संस्था, जिवीदा संस्था व वाईल्ड लाईफ अनलिमिटेड यांनी सुध्दा मदत देवू केली आहे. असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम यांनी कळविले आहे.