साकोली(राकेश भास्कर),दि.22ः कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कम्युनिटीत त्याचा प्रसार होऊ नये याकरीता देशात लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले आहे.25 मार्चपासून सुरु झालेले हे लाॅकडाऊन 3 मेपर्यंत असून या काळात संचारबंदीचे नियम तोडून विनाकारण मोटारसायकलसह इतर वाहनाने फिरणार्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याच काळात चारचाकी वाहनाने प्रवास शक्य नसल्याने अनेकांनी दुचाकीने छोट्या छोट्या रस्त्याने लपून छपून आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला.या काळात म्हणजे 25 मार्च ते 20 एप्रिल 20 पर्यंत साकोली पोलिसांनी तब्बल 755 वाहनधारकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कार्यवाही आतापर्यंतची सर्वात जास्त गुन्हे असलेली कार्यवाही असल्याचे पोलिस म्हणाले.या कालावधीत म्हणजे 25 मार्च ते 20 एप्रिल 2019 ला केवळ 86 गुन्ह्याची नोंद होती.
लॉकडाऊनच्या काळात दारू तस्करी, अवैधरित्या विक्री गुन्ह्यात मात्र कमालीची वाढ झाल्याचे सांगितले गेले.पोलिसांच्या म्हणण्यानुसार खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, विनयभंग, अपहरण, अपघात, अपघाती मृत्यू, जुगार इत्यादी प्रकारच्या गुन्ह्यात कमालीची घट झाली आहे. एप्रिल 2019 ला दारू संबंधित केवळ 2 गुन्हे नोंदले गेले असता लॉकडाऊन काळातील एप्रिल 2020 ला 13 गुन्हे दाखल झाले. त्यात चोरीचे प्रमाणही वाढले, एप्रिल 2019 ला एकही गुन्हा नसताना एप्रिल 2020 ला 6 गुन्हे नोंदवण्यात आले. लॉकडाऊन काळात बऱ्याच लोकांचा रोजगार हिरावला गेला त्यामुळेच ह्या चोऱ्या झाल्या असाव्या असा समज आहे. महत्वाचे असे की ह्या सहाही गुन्ह्याचा छडा लावून गुन्हेगारांना साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन काळात केवळ दोन अपघात घडले असून ह्यात एकही जीवित हानी झाल्याची माहिती नाही.





