बुलडाणा, दि. 22 : स्वतःचा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम करणाऱ्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात यावी, तसेच त्यांना पन्नास लाखांचे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे व बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडे दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना या भयंकर महामारी संकटाच्या काळामध्ये सर्वच यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी सर्वजण जोमाने काम करून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्वजण कसे काम करतात हे आपल्या माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून कर्मचारी व अधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम प्रसार माध्यमे करीत आहेत.
यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया सर्वांचाच सहभाग आहे.
अनेक वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मिडीया चे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वृत्त संकलनासाठी अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यस्त आहेत. नुकतेच मुंबईत झालेल्या चाचण्यांमध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांना, छायाचित्रकारांना कोरोना लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने मुंबई व नागपूर मध्ये पत्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली, शिवाय इतर शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रमाणे पत्रकारांना देखील पन्नास लक्ष रुपयांचे विमा कवच देण्यात आले. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांची सुद्धा कोरोना चाचणी करावी व या संकटसमयी शासनाने पाठीशी उभे राहून पत्रकारांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आहे.
पत्रकारांची कोरोना चाचणी करावी;बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची मागणी
50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचीही मागणी





