
आमगाव,दि.27 : बाघ व्यवस्थापन शाखा कालीमाटी अंतर्गत टेकरी वितरीकेत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली असून खासदार प्रफुल पटेल व पालकमंत्री अनिल देशमुख यांना निवदेन देण्यात आले आहे.
कालीमाटी शाखेंतर्गत टेकरी वितरीकेला आदेशानुसार रब्बी पिकांकरिता पाण्याची पाळी देण्यात आली. पण तेथे पाणी उशिरा पोहोचत असल्याने येथील शेतकर्यांच्या शेतातील उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बहुतेक शेतकर्यांचे धान पीक पाण्याअभावी नष्ट झाले आहे.
गोंदिया उपविभागीय मंजूर नियोजनाप्रमाणे टेकरी वितरिकेला घाट्टेमनी, लंबाटोला, गिरोला, मानेकसा, गोसाईटोला, नंगपुरा, रामजीटोला, बंजारीटोला, कालीमाटीला ६00 हेक्टर शेतीला पाणी दिले. सध्या धान गर्भावस्थेत असून पिकांना २ एप्रिलपासून पाणी मिळत नाही. ६00 हेक्टरपैकी १00 हेक्टर शेतीला पाणीपुरवठा झाला असून उर्वरित ५00 हेक्टर शेतातील धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्वरित टेकरी व मानेकसा वितरीकेला पाणी सोडण्यात यावे तसेच नष्ट झालेल्या पिकांचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, गुरुदेव पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष बाबूलाल दोनोडे, सेवकराम डोये यांनी केली असून खासदार पटेल व पालकमंत्री देशमुख यांना निवेदन दिले आहे




