अर्जुनी मोरगाव,दि.07ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली.पीक निघाले.मात्र आधारभूत हमी भाव मका खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती.यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी पत्राद्वारे अन्न पुरवठा मंत्री,पालकमंत्री,खासदार प्रफुल पटेल व आ मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे मागणी केली होती.त्या पत्राच्या आधारे आमदार चंद्रिकापुरे यांनी पालकमंत्री व खा.पटेल यांच्याकडे हा मुद्दा मांडल्यानंतर पालकमंत्र्यांनी खा.पटेलांच्या पत्रावरच त्यासंबधीचे निर्देश मार्केटिंग फेडरेशनला दिले होते.अखेर शासनाने जिल्ह्यात मका खरेदी केंद्राला मंजुरी दिल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी नगदी पिकाकडे वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जायचा.मात्र धान उत्पादक शेतकरी सहसा पीक पद्धतीत बदल करण्याच्या मानसिकतेत नसतो.तरी सुद्धा अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रात मका पीक लागवड करण्यात आली. पीक निघाले.मात्र आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले नाही.व्यापारी वाटेल त्या भावाने मका खरेदी करायचे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते.अनेक शेतकऱ्यांनी आ मनोहर चंद्रिकापुरे यांचेकडे धाव घेतली.त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचेशी यासंदर्भात बोलणी केली.ना भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला.त्यांचेकडून परवानगी मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हे आदेश गुरुवारी निर्गमित होणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुपे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितल्याची माहिती आ चंद्रिकापुरे यांनी दिली.सुमारे १७६० रुपये प्रति क्विंटल मक्याला भाव असल्याची माहिती पुढे येत आहे.यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे,किशोर तरोणे, अर्जुनी मोरगावचे नगराध्यक्ष किशोर शहारे,रतीराम राणे,पं स सदस्य सुशीला हलमारे,उद्धव मेहंदळे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे, योगराज हलमारे,सोमा नरवास यांनी आ चंद्रिकापुरे यांचेकडे आग्रही भूमिका मांडली होती.





