28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Ø  पाणी टंचाई आढावा बैठक

0
92

भंडारा, दि. 8:- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी  प्रभावी उपाय योजना राबवुन जिल्हयात कुठेही पाणी  टंचाई भासणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली  पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यावेळी उपस्थित होते.

उन्हाळयास प्रारंभ झाला  असून उन्हाळ्याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील लोकांना बसते. ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळाले पाहिजे. पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील नळ योजना व विंधन विहिर नादुरुस्त असल्यास  सर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देवून तात्काळ दुरुस्त कराव्यात. जून पर्यंत सर्व कामे झाली पाहिजे, त्यानुसार कामाचे नियोजन करावे. या कामाचे मॉनिटरिंग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करून कामावर जातीने लक्ष देवून कामास गती दयावी, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील नळ योजना व विहिर दुरुस्तीचे सर्व प्रस्ताव ताबडतोब शासनाकडे सादर करावे, मंजूरीसाठी पाठपूरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले.  प्रादेशिक नळ योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असल्याचे खासदार सुनिल मेंढे व आमदार राजु कारेमोरे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी  दिल्या.   जिल्हयातील जीवन प्राधिकरणाकडे असलेल्या चारही नळ योजनेचा अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले. नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात पाणी टंचाई भासू नये यासाठी टँकरची व्यवस्था करावी.   जिल्हा परिषद अंतर्गत नळ योजनेच्या प्रस्तावासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेवून  पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, असे ते म्हणाले

अनेक गावात हातपंपाद्वारे फ्लोराईडयुक्त पाणी येते,  शुध्द पाणी येत नाही, त्या नादुरस्त आहेत अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे हत्तीरोगासारखा आजार होण्याचा धोकाही संभवतो. पाणी टंचाईबाबत गंभीर रहा, जीवन प्राधिकरणाने सर्व तपासणी करुन अहवाल सादर करावा तसेच गाव निहाय अद्ययावत माहिती सादर करण्यास त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी सुधीर गवळी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये भंडारा, पवनी, सकोली, तुमसर नगरपरिषद व लाखनी, मोहाडी, लाखांदूर नगरपंचायतीचा आढावा सादर करण्यात आला.                         

धान खरेदी आढावा                             

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पाण्याने खराब झाले आहेत. त्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड भोगावा लागतो. अशा परिस्थितीत धानाची लवकरात लवकर खरेदी करुन तादळाची उचल तवरित करावी. पुढील धान खरेदीचे नियोजन व्यवस्थित करा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

यावेळी धान खरेदी व मिलींगचा आढावा घेण्यात आला.  जिल्हयात 67 धान खरेदी केंद्र होते त्यात 23 केंद्राची वाढ करुन  एकूण 90 धानखरेदी केंद्र कार्यान्वित आहेत. मिलर्स, धान खरेदी, भरडाई याबाबत माहिती देण्यात आली.

वनविभागाने बुरड समाजाला बांबुचा पुरवठा करावा. तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी प्रशासनाद्वारे लोकांना परवानगी देण्यात यावी. त्यांना अडवू नये, वनविभागाच्या नर्सरी वाढवा, असे त्यांनी सांगितले.