भंडारा, दि.8 मे – लॉकडाऊनच्या काळात कामगार, बेघर व भिकारी व्यक्तींना खरा आधार मिळाला तो शासनाने सुरू केलेल्या निवारागृहाचा व शिवभोजन थाळीचा. संचारबंदीच्या कठीण परिस्थितीत विस्थापित व गरजू नागरीकांना प्रशासनाने शिवभोजन थाळीचा लाभ दिला आहे. 16 एप्रिल ते 7 मे या 22 दिवसात 6 शिवभोजन केंद्रात 20 हजार 174 थाळी भोजन वितरित करण्यात आहे आहे. अडचणीच्या काळात शिवभोजन थाळीने आधार दिला, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. आणि हे सगळं सुरक्षित अंतर पाळून करण्यात आलं.
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद कॅन्टीन 6263, महसूल कॅन्टीन 5625, सामान्य रुग्णालय 3200, नवीन बस स्थानक तुमसर 1250, मुख्य बाजार तुमसर 1259 व लाखांदूर 2586 अशा एकूण 29 हजार 174 शिवभोजन थाळीचे आतापर्यंत वितरण करण्यात आले आहे. *विशेष म्हणजे जिल्हा परिषद येथील महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित कॅन्टीन मध्ये शिवभोजन थाळी अगदी मोफत वितरित करण्यात आली आहे*.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येऊन दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 5 रुपये थाळी याप्रमाणे शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करत शिवभोजन थाळीची संख्या वाढविण्याचा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच 160 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या काळात दिनांक 17 मे पर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ सुरु राहणार आहे.
या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सुरक्षित अंतर काटेकोरपणे पालन करण्यात येईल. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी यांना अधिक लाभ होणार आहे. शिवभोजन थाळी नियोजनाचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाचे भांडारा जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे हे चोखपणे पाहत आहेत.





