भंडारा, दि. १० (जिमाका) : भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या गराडा येथील रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने भंडारा जिल्हा करोना मुक्त झाला आहे.रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा १४ दिवसानंतरचा दुसरा नमुना ९ मे रोजी नागपूर येथे पाठविण्यात आला होता तो आज निगेटिव्ह आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून, आतापर्यंत ६०६ व्यक्तींचे घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ५६९ व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या तारखेत नागपूर येथे घशातील स्त्रावाचे नमुना अहवाल ३६ प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे १८९ व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
परदेशातून एकही व्यक्ती जिल्ह्यात आली नसून आतापर्यंत ३९२ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात २० हजार ७२८ व्यक्तींनाचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना केल्या असून ज्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात आला आहे अशा नागरिकांनी २८ दिवस घराबाहेर पडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिले आहेत. प्रशासनाने दिलेले निर्देश काटेकोरपणे पाळावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
आतापर्यंत तीव्र श्वासदाहचे एकूण ११७ व्यक्तींना भरती करण्यात आले असून ११६ व्यक्तींचे घशातील नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत त्यापैकी ११५ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७२ हजार ९७६ नागरिकांनी आरोग्य सेतू अँप्लिकेशन डॉउनलोड केले आहे.
आतापर्यंत भंडारा जिल्ह्यामध्ये गराडा बु. येथील एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे फ्लु ओपीडी सुरु करण्यात आलेली आहे. गावपातळीवर घरोघरी आशा व आंगणवाडी सेविकामार्फत आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
जिल्हयात १७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन असून नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळून जीवनावश्यक व्यवहार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी केले आहे.





