
मुंंबई,दि.15ः- राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक गुरुवारला पार पडली. या बैठकीत सर्वांचे लॉकडाऊन वाढवण्यात एकमत झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवले जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवले जाणार आहे याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही. केंद्र सरकारकडून जोपर्यंत लॉकडाऊन ४ च्या नव्या अटी-शर्थींची सविस्तर माहिती दिली जात नाही तोपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.या बैठकीत लॉकडाऊन ३१ मे पयर्ंत कायम ठेवण्यावर एकमत झाले आहे. सोबतच उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे. पण कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही समजत आहे. मात्र अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकत घोषणा करण्यात आलेली नाही.




