गडचिरोली,दि.२० : जिल्हयात आणखी २ रुग्ण करोनाविषाणू पॉझिटीव्ह आढळून आले असून, आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८ झाली आहे.सोमवारी(दि.१८) कुरखेडा तालुक्यातील ४ व चामोर्शी तालुक्यातील १ असे ५ रुग्ण करोना पॉजिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर कुरखेडा, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील १० ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी(दि.१९) संध्याकाळी ७ वाजता एका रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता.त्यामुळे मंगळवारपर्यंत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६ होती.
आज बुधवारला दुपारी १२ वाजता प्राप्त अहवालानुसार आणखी दोन रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक रुग्ण मूळचा खेडेगाव येथील रहिवासी असून, तो कुरखेडा येथील संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात होता. कुरखेडा येथे आढळलेल्या पहिल्या रुग्णासोबत तो संस्थात्मक विलगीकरणात होता. दुसरा रुग्ण चामोर्शी तालुक्यातील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या ८ वर पोहचली आहे. नवे रुग्ण यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ५ रुग्णांसोबत प्रवास केलेल्यांच्या संपर्कातील होते, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. शंकरनगर, कुरखेडा व चामोर्शी येथील तिन्ही रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात आणले जाईल. काल गोंदिया जिल्ह्यात आढळलेले दोन रुग्णसुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांसमवेतच मुंबईहून ट्रकने आले होते, हे येथे उल्लेखनीय.





