गोंदिया दि.२६(जिमाका) कोरोना विषाणूचा संसर्ग गोंदिया जिल्ह्यात वेगाने पसरतो आहे. या विषाणूची सौम्य व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण करून कोविड केअर सेन्टर असलेल्या गोंदिया येथील एम.एस.आयुर्वेदीक महाविद्यालय, व जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली,गोंदिया येथे भर्ती करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना दररोज चहा,नास्ता व जेवणाचे जे कंत्राट ज्या पुरवठादाराला देण्यात आले होते ,त्या कंत्राटदाराने या कामात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे संबधित कंत्राटदारावर आज २६ मे रोजी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकृपा स्वयं रोजगार सहकारी संस्था गोंदियाचे संचालक उदय साकोरे या कंत्राटदाराला 15 मे 2020 रोजी कोरोना कोविड सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलेल्या रुग्णांना दररोज दोन वेळ चहा, सकाळी नास्ता व दोन्ही वेळचे जेवण पुरविण्याच्या अटी व शर्तीच्या आधारे भोजन पुरवठ्याचा कार्यादेश देण्यात आला होता परंतु भर्ती करण्यात आलेल्या रुग्णांना वेळेवर जेवणाचा पुरवठा न केल्याची तक्रार जिल्हधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना निर्देश देऊन जेवणाचा दर्जा उत्तम देण्यास तसेच वेळेवर पुरवठा करण्याकरिता निर्देशीत केले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपीकडून लेखी स्वरुपाचे हमीपत्र घेऊन वेळेवर जेवण व सर्व सुविधा पुरविण्याची हमी घेतली होती. परंतु या संदर्भात त्याच तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्यामुळे आज २६ मे रोजी रामनगर पोलिस ठाण्यात उदय साकोरे यांच्याविरुद्ध करार भंगाचा गुन्हा दाखल करुन भारतीय दंड संहिता १८६० ची कलम १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ची कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड-१९ विनिमय,२०२० ची कलम ११, तसेच साथरोग अधिनियम १८९७ ची कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर यांच्या तक्रारीवर आरोपी उदय साकोरे यांच्या विरुध्द आज सायंकाळी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकणाची चौकशी ठाणेदार प्रमोद घुगे करीत आहे.




