तिरोडा,दि.27:-गोंदिया जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून हा आकडा ५० वर पोचला आहे.त्यातच तिरोडा शहरातही बाधीत रुग्ण आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने शहराला बफर झोन जाहिर करुन दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय दुकाने व रुग्णालय वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ बंद करण्यात आली आहेत.बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील 23 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल येईपर्यंत संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याची माहिती आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकार्यांनी दिली.त्यावर नागरिकांची अडचण समजून घेत आमदार रहागंडाले यांनी भाजीपाल्याची बंद असलेली दुकाने दोन दिवसात चार ठिकाणी विभाजीत करुन उद्यापासून सुरु करण्याचे निर्देश दिले. सोबतच शहरात मुंबई व पुण्यावरुन मोठ्याप्रमाणात नागरिक येत असल्याने त्यांना होम क्वारंटाईन न करता औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील संस्थागत केंद्रात क्वारंटाईन करण्याची सुचना केली. तसेच या क्वारटांईन केंद्रात कुणी अनधिकृत व्यक्तीने प्रवेश केल्यास ५००० रुपये दंड आकारून गुन्हा दाखल करण्यात यावे असे आदेश देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावून जिल्हा सीमेवर येणा-या प्रत्येक नागरिकांची माहिती पोलीस विभागाने न.प.प्रशासनास द्यावी, कोरोनटाइन केंद्रामध्ये जेवणाची गुणवत्ता वाढविण्यात यावी अशा सुचना सर्व विभागाला आमदार विजय रहांगडाले यांनी या बैठकित दिल्या. बैठकीला प्रामुख्याने नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे,तहसीलदार प्रशांत घोरुडे,मुख्याधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी सतीश लिल्हारे,तालुका आरोग्य उपधीक्षक डॉ.चंद्रकिशोर पारधी, तालुका वैदयकिय अधिकारी डॉ.शीतल मोहने, पोलीस उपनिरीक्षक राधा लुटे तसेच न.प.तील आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.





