भंडारा, दि. 27 : – राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहिर केली आहे. त्यानुसार योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाख रुपयांपर्यंतआहे अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भुधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या अर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत देण्यात येणार आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना चालु खरीप हंगामात पीक कर्ज मिळणार असल्याचे 22 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये शासनाने जाहिर केलेले आहे.
कर्जमाफीस पात्र असूनही खात्यात पैसे व आलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना आता चालु खरीप पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतिक्षेत व केवळ आधारकार्डचे प्रमाणीकरण राहिलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांना शासन निर्णयातील घोषणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
त्यानंषंगाने जिल्हयातील 31 हजार 574 शेतकरी कर्जमाफीस पात्र झालेले होते. त्यामधील 20 हजार 71 शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला आहे त्यापैकी एकूण 1 हजार 293 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या ऑनलाईन तक्रारी जिल्हास्तरीय समिती व आधारप्रमाणीकरण होत नाही अशा तक्रारी तहसिलदारांकडे प्राप्त झालेल्या होत्या. उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे थांबलेली होती.
मात्र आता नव्याने शासनाने 6 हजार 324 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणीकरण करुन त्यांना नव्याने पीककर्ज देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तत्पुर्वी कर्जमाफीचा लाभ न मिळालेले व केवळ पात्र नाव असलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून टाळाटाळ केले जात होते. त्यामुळे शासनाने आता कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही पीककर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
लॉकडाऊनपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडाराचे 15 हजार 664 शेतकऱ्यांचे आधारप्रमाणीकरण करण्याचे काम झाले होते. या शेतकऱ्यांच्य खात्यावर 35.80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. अद्याप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडाराचे 7 हजार 325 शेतकरी व राष्ट्रीयकृत बँकांचे 2 हजार 260 आसपास शेतकऱ्यांचे आधारकार्ड प्रमाणीकरण करण्याचे काम काही कारणांमुळे शिल्लक राहिलेले आहे.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे केवळ नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये असल्यामुळे पीककर्ज मिळण्यासाठी बँकांना विनवणी करावी लागत होती. परंतु आता कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळणार असून ती रक्कम शासननिर्णयाप्रमाणे आता शेतकऱ्यांऐवजी शासन बँकांना देणार आहे. तरी जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांची नावे शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीत आहे व ज्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यांनी पीककर्ज प्राप्त करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक व नजिकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.





