गडचिरोली,दि.२९: आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तोडण्यासाठी केलेले सीमांकन चुकीचे असल्याचे सांगून एका लाकूड कंत्राटदाराकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. दिवाकर रामभाऊ कोरेवार(४८) व प्रेरणा उईके(३४) असे जाळ्यात अडकलेल्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची नावे आहेत. दिवाकर कोरेवार हे वडसा वनविभागात संरक्षण व अतिक्रमण निर्मुलनाच्या फिरत्या पथकात, तर प्रेरणा उईके या कोरची तालुक्यातील बेळगाव वनपरिक्षेत्रात अधिकारी आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव वनपरिक्षेत्रांतर्गत सोहले येथील दोन आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर सागवानाची झाडे आहेत. ही झाडे तोडण्याचे कंत्राट कोरची येथील एका व्यक्तीने घेतले होते. त्यासाठी संबंधित विभागाकडून जमिनीचे सीमांकन करण्यात आले. परंतु सीमांकन चुकीचे असून, सर्वे क्रमांक १ ते ११ मधील मालाच्या चौकशीत शिथिलता देण्यासाठी फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर कोरेवार यांनी कंत्राटदारास २ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो १ लाख ७५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचला असता आरएफओ दिवाकर कोरेवार यांना आरएफओ प्रेरणा उईके यांच्यामार्फत् १ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलिस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर व घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.
लाखो रुपयांचे सागवान फस्त
वडसा वनविभागांतर्गत् काही वनाधिकाऱ्यांनी बेळगाव वन परिक्षेत्रात आदिवासी खसरा म्हणून जंगलातील लाखो रुपयांचे सागवान फस्त केले आहे. कोरची तालुक्यातील मयालघाट येथे आदिवासींच्या शेतातील फक्त ४० घनमीटर सागवान अपेक्षित असताना जंगलातील ९३ घन मीटर सागवान गोंदिया जिल्ह्यात विकल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचारी वर्गात सुरू आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून आदिवासी खसरे किती झाले व या खसऱ्यांचे सीमांकन खरंच बरोबर आहे की नाही, याची खात्री करून सखोल चौकशी केली तर खूप मोठे घबाड समोर येईल, असे बोलले जात आहे





