
गडचिरोली,दि.30ः एकीकडे संपूर्ण जग कोविड-19 अर्थात कोरोना या संसर्गजन्य रोगाशी लढत असताना धानो-यातील एका युुुुवकाच्या विकृत व्हाटसअप पोस्ट वर तीव्र संंताप व्यक्त केला जात आहे. धानो-यातील एका कुटूंबातील एक व्यक्ति जो बाहेरून येऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षातील लोकांच्या संसर्गात आल्यामुळे पॉझिटिव्ह झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा ऊपाय म्हणून त्या कुटूंबाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले.त्या कुुटूंबातील व्यक्तीमुळे हा प्रादुर्भाव गावात पसरेल व धोका निर्माण होणार असल्याने त्याचे घरच पेटवून द्यावे असा संदेश व्हाटसअपद्वारे प्रसारीत केल्याने अनिल म्हशाखेत्री नामक युवकावर पोलिसांनी धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारला दुपारी एक ते दीड वाजता च्या सुमारास धानोरा येथील एका व्हाटसअप ग्रुपवर अनिल म्हशाखेत्री याने कोरोना पॉजिटीव आढळून आलेल्या कुटूंबातील व्यक्तिमुळे मुळे हा प्रादुर्भाव गावात पसरेल व मोठा धोका निर्माण होईल. त्यामुळे त्या व्यक्तिचे घरच पेटवून द्यावे असा संदेश प्रसारित केला व त्या कुटूंबाचे नावही सदर ग्रूपवर पोस्ट करून त्या कुटूंबाची ओळख सर्वांसाठी खुली केली.
सदर पिडीत कोरोंटाईन व्यक्ति हा सुद्धा त्या ग्रूपवर असल्याने त्याने सदर पोस्टचा स्क्रीन शॉट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे पाठवला. दोन्ही अधिका-यांनी अत्यंत चुकिच्या आणि विकृत पोस्टची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. धानोरा पोलीसांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे ऊल्लंघन करून व्हाटसअप या समाजमाध्यमाचा वापर करून कोरोना पॉजिटीव रूग्णाच्या कुटूंबाची ओळख खुली करून देत त्यांचे घर पेटवून द्यावे लागेल असे मत व्यक्त केले. व नागरिकांमध्ये वेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून धानोरा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अनिल म्हशाखेत्री याचेवर भादंविचे कलम 188 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पोलीसांनी चौकशी सुरू केली असली तरी अद्याप आरोपीस अटक केली नाही.





