यवतमाळ, दि.३०::-जिल्ह्यात पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 पर्यंत गेला असून यापैकी 99 जण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यु झाला नव्हता, मात्र आज एका महिलेचा मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे.
मृत झालेल्या या महिलेच्या प्रकृतिवर डॉक्टरांचे सुरवातीपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मध्य रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यु झाला. जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे की, कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसताच त्यांनी जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि शासकीय आरोग्य संस्थेत जावून तपासणी करून घ्यावी. किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क करावा. जेणेकरून बाधित रुग्णावर उपचार करणे सोयीचे होईल. नागरिकांनी याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नये. तसेच जिल्ह्यात पहिल्या मृत्युची नोंद झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईवरून आलेला आणि सुरवातीपासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 25 आहे.





