30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ *गोंदिया जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार*

*गोंदिया जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार*

0
729

गोंदिया,दि.२( जिमाका) राज्य शासनाच्या ३१ मे २०२० रोजीच्या नियमावलीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊनचे नवीन नियम लागू करण्यात येत आहेत. जिल्ह्यात ३० जून २०२० पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू राहील. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील. सामाजिक अंतराचे निकष पाळले जात नसल्याचे किंवा गर्दी होत असल्याचे दिसून आल्यास सदर दुकाने, मार्केट तात्काळ बंद करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय व्यावसायिक, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णवाहिका यांना फक्त त्यांच्या अनुज्ञेय कामासाठी जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा वाहतुकीस कोणतेही बंधने राहणार नाहीत. तथापि, नागरिकांच्या आंतरजिल्हा व आंतरराज्य हालचालीचे नियमन केले जाईल. अडकून पडलेले मजूर, स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक यांना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात येईल. त्याचप्रमाणे श्रमिक रेल्वेद्वारे आणि समुद्री मार्गाने केल्या जाणाऱ्या प्रवासाचे यापूर्वी निर्गमित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार नियम केले जाईल. परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिक, परदेश प्रवास करणाऱ्या निर्दीष्ट व्यक्ती यांची प्रवासी वाहतूक, परदेशी नागरिकांचे स्थलांतरण, भारतीय समुद्रमार्गे दाखल होणारे व बाहेर जाणारे प्रवासी यांचे नियमन यापूर्वी निर्गमित केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार यानंतर देखील केले जाईल. सर्व प्रकारच्या वस्तूंची वाहतूक, मालवाहतूक व रिकामे ट्रक वाहतुकीस परवानगी राहणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवीन आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. मात्र, ऑनलाईन लर्निंग व दुरुस्थ पध्दतीने शिक्षण सुरु राहील. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास (केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळालेल्या व्यक्ती वगळून) बंद राहील. स्वतंत्र आदेश व प्रमाणित कार्यपद्धती निर्गमित करून परवानगी देण्यात आलेल्या प्रकरणांचा अपवाद वगळता रेल्वे व स्थानिक विमानद्वारे प्रवास बंद राहील. सर्व सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, जलतरण तलाव, मनोंरजन पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरीयम, सभागृह यासारखी ठिकाणे बंद राहतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उत्सव व सामुदायिक सभा, परिषदा यांना मनाई राहील. धार्मिक ठिकाणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. केशकर्तनालये, सलून, ब्युटीपार्लर व स्पा केंद्र बंद राहतील. शॉपिंग मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, या आस्थापनामधील खाद्यपदार्थांची घरपोच सुविधा अनुज्ञेय राहील. इतर आतिथ्य सेवा सुद्धा बंद राहतील.

प्रतिबंधित सेवा, आस्थापना वगळता महारष्ट्र शासनाच्या आदेशान्वये परवानगीप्राप्त इतर सेवा, आस्थापना सुरु करण्यासाठी शासकीय कार्यालयाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा खुला भाग आणि इतर मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक व्यायाम करण्यास परवानगी राहील. प्रेक्षकांना तसेच समूहाने व्यायाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. इनडोअर स्टेडियम, स्टेडीयमच्या आतील बंदिस्त जागेत व्यायाम करण्यास परवनागी राहणार नाही. सर्व शारीरिक व्यायाम करताना सामाजिक अंतराचे निकष पाळावेत. ६५ वर्षे वयोगटावरील व्यक्ती, अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि दहा वर्षेपेक्षा कमी वयाच्या मुलांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

दुचाकीवरून फक्त एका व्यक्तीला तर तीनचाकी व चारचाकीमधून आवश्यकतेनुसार चालक आणि जास्तीत जास्त २ व्यक्तींना परवानगी राहील. ५० टक्के प्रवासी क्षमतेचे तसेच सामाजिक अंतर स्वच्छतेचे निकष पाळून जिल्ह्यांतर्गत बस सेवेस परवानगी देण्यात येत आहे. आंतरजिल्हा बससेवेद्वारे प्रवासी वाहतुकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

सर्व खासगी कार्यालय प्रमुखांनी शक्यतोवर ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीला प्राधान्य द्यावे. सर्व कार्यालये, आस्थापना येथे थर्मल स्क्रीनिंग, हात धुण्याबाबतच्या सुविधा आणि सॅनिटायझर यांची प्रत्येक प्रवेश आणि निर्गमन केंद्रावर उपलब्धता ठेवावी. कामाचे संपूर्ण ठिकाण, सामायिक सुविधेची ठिकाणे व इतर ठिकाणे जेथे व्यक्तींचा संपर्क येतो; जसे की, दरवाजे हँडल्स इत्यादींचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, दोन पाळ्यांमध्ये पुरेसा अवधी, दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुमती देणे याबाबत खबरदारी घ्यावी.

सर्व कार्यालय प्रमुख, आस्थापनाधारक, वाहन चालक व इतर नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप शक्यतोवर डाऊनलोड करावे व आपल्या आरोग्यविषयक स्थितीबाबत सदर अॅपमध्ये वेळोवेळी माहिती नोंदवावी. जेणेकरून संबंधितांना वैद्यकीय सेवा देणे शक्य होईल. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी किमान सहा फुटांचे सामाजिक अंतर ठेवावे. दुकानमालक, आस्थापनाधारक यांनी त्यांच्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना आपल्या दुकान, आस्थापनेसमोर थांबण्याची परवानगी देवू नये. विवाह समारंभास उपस्थितांची संख्या ५० पेक्षा अधिक असणार नाही, तसेच अंत्यविधीसाठी उपस्थितांची संख्या २० पेक्षा अधिक असणार नाही, याची दक्षता घ्यावी. मद्यपान, तंबाखू यांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित असेल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापना यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी १ जून २०२० रोजी निर्गमित केला आहे.