गडचिरोली, दि २:: येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याच्या त्यांच्याच पक्षाच्या १५ नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून ८ जूनला सुनावणी करण्याचे निश्चित केले आहे.
गडचिरोली नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता असून, योगिता पिपरे या थेट जनतेतून निवडून गेल्या आहेत. परंतु मागील दोनेक वर्षापासून सौ.पिपरे व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्येच वितुष्ट निर्माण झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणून असंतुष्ट नगरसेवकांनी पिपरे यांच्याविरोधात अनेकदा तक्रारी केल्या. अविश्वास ठराव आणण्यापर्यंत हा विषय पुढे गेला होता. परंतु काही महिन्यांपूर्वी खा.अशोक नेते यांनी मध्यस्थी करुन दोन्ही पक्षांत समेट घडवून आणल्याने विषय पुढे सरकला नाही. परंतु आता पुन्हा या समस्येने उग्र रुप धारण केले आहे. २२ मे रोजी बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार यांच्यासह इतर १४ नगरसेवकांनी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. नगराध्यक्ष योगिता पिपरे या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या ठराव मंजूर करवून घेत आहेत, त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करावे, अशी या १५ नगरसेवकांची मागणी आहे. त्यावर आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




