36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

0
296

blank

अमरावती, दि. 3 : गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतून परतवाडा-अचलपूर हे जुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरकुले साकारण्याचा निर्णय जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. या दृष्टीने आवश्यक निधी व इतर प्रक्रिया तत्काळ पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.कडू यांनी यावेळी दिले.

अचलपूर येथील विश्रामभवन येथे राज्यमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रशासनाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, बांधकाम सभापती संजय तट्टे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील पाणी पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिका भवन, आठवडी बाजार आदींसंदर्भात आढावा राज्यमंत्री श्री.कडू यांनी घेतला. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व नागरी पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी. जुळ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक हजार घरकुलांची उपाययोजना तत्काळ पूर्णत्वास जाईल, या दृष्टीने प्रयत्न  करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी नगरपालिकेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ही कामे गतीने करावी. निधीची कमतरता पडू देणार नाही. योजनेत पीआर कार्ड वडिलांच्या नावाने असलेल्या व लाभार्थी अर्जदार मुलगा असलेल्या एकूण 220 घरकुलांच्या प्रकरणांना तत्काळ मंजूरी प्रदान करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पाणीपुरवठ्यासाठी पूरक जलसंचय स्त्रोत  उपलब्ध असताना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुनियोजित उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. येत्या एक महिन्याचा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होऊन पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे, असे निर्देश राज्यमंत्री श्री.कडू यांनी दिले.   शहरातील साप्ताहिक बाजार, नगरपालिका भवन आदींबाबतही चर्चा यावेळी झाली.

blank