27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ थाडेझरीच्या त्या महिलेचा जीवन जगण्यासाठी संघर्ष

थाडेझरीच्या त्या महिलेचा जीवन जगण्यासाठी संघर्ष

0
337

सडक अर्जुनी,दि.10 : शासनाच्या वतीने समाजातील दुर्बल घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासकीय योजना आखण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ मिळत नसल्याचे अनेक प्रकारावर समोर आले आहे. त्यातच तालुक्यातील वनग्राम थाडेझरी येथील वनिता मडावी या महिलेचा शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याने तिचा जीवन जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शासनातील अधिकारी, कर्मचारी दखल घेणार, या प्रतिक्षेत असलेल्या वनिता मडावी हिला निराशा मिळाली आहे. याकडे जनप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील पुर्नवसीत वनग्राम थाडेझरी येथील रहिवासी भाष्कर मडावी हा जन्मापासून आंधळा होता. याचे लग्न गावातीलच वनिता या मुलीशी झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. एक मुलगा शैलेश व मुलगी करिश्मा. भाष्कर आंधळा असूनही बासरी वाजविण्याची कला अवगत असल्याने लग्न संभारभात बासरी वाजवित होता. परिसरातील गावागावात जाऊन तो बासरी वाजवायचा. त्यातून जे काही पैसे मिळत त्यावर त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. आंधळा असून त्याला दिव्यांग कल्याणासाठी असलेल्या कोणत्याही योजना व शासकीय मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यातच भाष्कर मडावी याचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यामुळे त्याचे कुटूंब संकटात सापडले. मुलगा शैलेशचे शिक्षण इयत्ता नववी पर्यंत झाले. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढे शिकावे की नाही? की मोलमजुरी करून आईला हातभार लावावा, अशा द्विधा मनस्थितीत शैलेश आहे. शासनाने त्यांची नेहमीच उपेक्षा केली. तसेच नागझिरा अभयारण्यात पुनर्वसन केलेल्या वनग्राम थाडेझरी येथे राहूनही वन्यजीव विभागाने कोणतीच मदत केली नाही. सन १९७२ ला नागझिरा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती झाली गावकर्‍यांना अद्यापही शेत जमिनीचे पट्टे मिळालेले नाही, सिंचनासाठी शेतीत विहीर खोदायला ही परवानगी नाही, गावाजवळच्या तलावाचे खोलीकरण नाही, अशा परिस्थितीत संपूर्ण थाडेझरी गाव जीवन जगत आहेत. सन १९७२ पासून पुनर्वसित गावातील नागरिकांसाठी असलेल्या कोणत्याही सोयी- सुविधा वन्यजीव संरक्षण विभागाकडून त्याला मिळाल्या नाहीत. पुनर्वसित करताना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.
अशा परिस्थितीतही विनिता मडावी कुटूंबासह जीवन व्यापन करीत आहे. आजही त्याचे संपूर्ण आयुष्य पडक्या घरात गेले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात २२ मार्च पासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. रोजगार थांबला त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न वनितासमोर निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षणाचा प्रश्नही कायम आहे. जीवन जगण्याचा संघर्ष सुरू असताना राहायला नीट घर नाही. वादळ, पावसात घर कोसळणार, अशी स्थिती घराची झाली आहे. उन्हाळा व हिवाळ्यात या घरात ते कसेबसे दिवस काढतात. परंतु पावसाळा आला की मात्र त्याचे कुटुंब दुसर्‍याच्या घरी आश्रयाला जावे लागते. त्याचा परिवार मोठ्या हलाखीचे जीवन व्यतीत करित आहे.कुटुंबाला घरकुल मंजूर झाले नाही. मुलीचे लग्न करण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे वरपक्षाने वनिताची नाजूक परिस्थिती पाहून, आपल्या घरी नेऊन विवाह समारंभ उरकावून टाकला. शासकीय योजनांच्या कोसो दूर असलेली वनिता घरकुलाची आस लावून आहे. आजही तिच्या परिवाराची परिस्थिती हलाखीची असून शासन आज ना उद्या दखल घेणार, असा विश्वास तिला आहे.