25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home शैक्षणिक महाराष्ट्राचे अलंकार साने गुरुजी

महाराष्ट्राचे अलंकार साने गुरुजी

सौ. जयश्री निलकंठ सिरसाटे,गोंदिया मो. क्र. 9423414686

0
569

‘मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे. मी तिचा भक्त आहे. मराठीवर प्रेम करण्यात मी कुणालाही हार जाणार नाही. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभतो.’ किती सुंदर शब्दात आपल्या भाषेवर प्रेम करणार्‍या ओवीत आपले विचार व्यक्त केलेत. अशा आपल्या भाषेवर आपल्या आई इतकेच प्रेम करणार्‍या साने गुरुजींचा आज स्मृति दिन.
बालवयात योग्य संस्कार झाले तर संपूर्ण आयुष्य कसं सूर्याप्रमाणे प्रकाशमान होतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे यशोदा सदाशिव साने. या मातेने अगदी बालपणापासूनच आपल्या बाळावर संस्कार टाकले ते जीवनभर व मृत्यु पश्चात अजरामर झालेत. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरी च्या ऐश्वर्या ला सुद्धा लाजवेल हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानच होत. अशा या श्यामच्या यशोदा आईला त्रिवार नमन. बाल वयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात ते आयुष्यभर त्याची सोबत करतात. हे लक्षात घेऊन आई-वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजेत. पूजनीय साने गुरुजी यांना सुदैवाने तसेच आई-वडील लाभले होते.जर साने गुरुजी ला यशोदा सारखी संस्कार टाकणारी आई नसती तर कदाचित आज साने गुरुजी ला कुणीही ओळखलं नसतं. म्हणूनच म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी दापोली तालुक्यातील पालगड या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्हात येते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, पण त्यांना घरी पंढरी म्हणत.त्यांची आई यशोदाबाई, वडील सदाशिवराव हे पंढरीचे योग्य तर्‍हेने संगोपन करत. ते प्रथम पालगड च्या शाळेत शिकले. त्यांचे वडील त्यांच्या शिक्षणात फार दक्ष होते. तसेच यशोदाबाईने लहानपणी त्यांच्या वर फार मोलाचे संस्कार केले. सालस, गुणी, कष्टाळू आणि सात्विक मनोवृत्ती असलेल्या पंढरीची पुढे ‘गुरुजी’ हीच ओळख झाली. लहान वयातील शारीरिक-मानसिक जडण-घडण करण्याची जबाबदारी ही मुख्यत: आई वरच पडते. त्यांची आई तशीच होती.त्या म्हणायच्या” पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मन घाण होऊ नये म्हणूनही जप हो !” , खोटे कधी बोलू नको, ‘ कोणत्याही प्रकारचे काम करण्याची लाज बाळगू नको ”, ” दिन दुबळ्याना मदत करण्यास पुढे हो” अशा अनेक गोष्टी त्यांना लहानवयात रुजवण्यात आल्या. त्या प्रेम करीत,पण चुकी झाल्यास कठोर शिक्षा देत असत.त्यामुळे मोठेपणी ते सत्यनिष्ठ, परोपकारी, प्रामाणिक बनले.
ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही खडतर व लांब असतो
पालगडचे पाचवीपर्यंत शिक्षण झाल्या नंतर ते मामा कडे पुण्याला गेले, तेथे त्यांनी अनेक धार्मिक पोथीपुराणांचे वाचन केले पण आईकडे जाण्याच्या ईच्छेने ते परत पालगडला आले. त्यासाठी त्याना खूप बोलणी खावी लागली. पण ते भरपूर कामे करून आईची मदत करीत असत त्यामुळे घरच्यांचा राग दूर करत. नंतर ते इंग्रजी शिक्षणा करीता आत्याकडे दापोलीला राहिले तेथे त्यांनी आपली वाचनाची हौस भागविली. संस्कृत, ईंग्रजी, मराठी अशी अनेक पुस्तके त्यांना तेथे वाचनास मिळत.त्यानंतर माहिती पडले की औंध ला मोफत शिक्षण व जेवण मिळते. तेव्हा घरच्यांच्या परवानगीने ते औंध ला गेले.काही दिवसातच तेथे प्लेग ची साथ आल्यामुळे ते परत आले. नंतर ते पुण्याला गेले, १९२२ मध्ये बी.ए. ची पदवी उत्तीर्ण झाले.पुढे अमळनेरला तत्वज्ञान मंदिरात काम करीत एम.ए.झाले.
करेल मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे
साने गुरुजींना खानदेश एजुकेशन सोसायटी शाळेत नोकरी मिळाली. मुलांना शिकविण्याची त्यांची पद्धत आणि त्यामागची कळकळ पाहून उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्धी झाली. काही दिवस वस्तीगृहाचे काम चालविले. मुलांना चांगले संस्कार देण्याची त्याना संधी मिळाली. त्यावेळीच त्यांच्या मनात आपण देशासाठी काही तरी करावे असे वाटू लागले. नेत्यांची भाषणे, गांधीजींच्या चळवळी जनतेला मिळणारे संदेश या सर्व गोष्टींने त्यांच्या मनावर देशा विषयीच्या भावना बळावल्या.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी
१९३० मध्ये त्यांनी शाळा सोडली.आणि ते आश्रमात दाखल झाले. सत्याग्रहाच्या कामात भाग घेऊन भाषणे करू लागले त्यांच्या भाषणाने तरुणांना भारावून जात. त्यांच्या अंमळनेरच्या भाषणात त्यांवर खटला भरण्यात आला त्याना १५ महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली.त्यातही त्यांनी लोकशिक्षण, लेखन, स्फूर्ती गीते चालूच ठेवले.” स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई”, ”दुखी सारख्या कथा,” ”खरा सत्याग्रही” , क्रांती, आस्तिक, अशा कथा कादम्बरी, नाटके त्यांनी लिहिलीत. त्यांची ”श्यामची आई ” ही कादम्बरी फार प्रसिद्ध झाली.

श्यामची आई या कादंबरीतील बालमनावर संस्कार रूजविणारे धडे आजही प्राथमिक स्तरातील वर्गात अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे. स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत राहून त्यांनी देशाच्या स्वांतंत्र्यासाठी अंनेकांना प्रेरणा दिली.
साने गुरुजींनी लिहिलेले ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे….’ ही प्रार्थना आजही प्रत्येक शाळेत विद्यार्थी मोठ्या भक्ति भावाने म्हणतात. ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो….’ हे देशभक्ति दर्शविणारे साने गुरुजीनी लिहिले ले गीत म्हणताना आपोआपच देशभक्ति जागृत होते.
”आधी केले मग सांगितले” या विचारांचे ते होते. समाजात एकोपा राहावा असे त्याना वाटे. ”साधना साप्ताहिकांचे संपादन” कुमार संमेलनाचे अध्यक्षपद, मंदिर प्रवेशाच्या निमित्ताने पंढरपुरला प्राणांतिक उपोषण असे समाज कार्य करताना त्यांनी कुमारांना संदेश म्हणून सांगितले ” देशी- विदेशी वाड्मयाचा अभ्यास करा, अनुवाद करा. सर्वत्र हिंडून वाड्मय गोळा करा, आणि देशाची, समाजाची सेवा करा ही शिकवण त्यांनी दिली व सेवा दलात त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले होते. ते मनाने फार हळवे होते देशाच्या स्वातंत्र्या नंतर घडलेल्या काही घटनांनी अस्वस्थ झालेले गुरुजी अखेर ११ जून १९५० साली देवाघरी गेलेत.
आज त्यांचा स्मृति दिन असून जरी आज ते या जगात नसले तरी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात ते जिवंत आहेत. आजही सन्मानपूर्वक एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून, आदर्श शिक्षक म्हणून साने गुरुजींचे नाव आदराने घेतले जाते.
मेघ सारे पाणी देतात, झाडे फळे देतात , फुले सुगंध देतात, नद्या ओलावा देतात, सुर्य चंद्र प्रकाश देतात, यशोदा सारखीआई मुलांवर संस्कार देतात व त्यामुळेच असे साने गुरुजी सारखी संस्कारी मुले तयार होतात.