गडचिरोली,दि.११ःशहराच्या नगरपरिषदेत पहिल्यांदाच जनतेने एक हाती सत्ता मोठ्या विश्वासाने व अपेक्षेने भाजपच्या हातात दिली.परंतु गेल्या ३ वर्षा पासून सातत्याने अंतर्गत वादामुळे जनतेचे व शहराचे बेहाल झाल्याचा आरोप रुचित वांढरे यांनी केली आहे . नगरपरिषद निवडणुकी दरम्यान भाजप उमेदवारांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण न होता त्याऊलट होणारी कामे सुध्दा ठप्प पडल्याचे मत नागरिकांमध्ये असून असंतोष व्यक्त केला जात आहे.
सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्षांचा नागरिकासबत संपर्क नसल्याने गडचिरोली शहरातील वॉर्डामध्ये नगरसेवक कोण आहे आणि कसा दिसतो याचा देखील विसर पडल्याची टीका वांढरे यांनी केली आहे. शहरातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांची स्वछता किमान महिन्यातुन चारदा करणे गरजेचे आहे,परंतु ते सुध्दा होत नसल्याने सर्वत्र घाण साचलेले आहे. तर नळयोजनेचे पाणी १५ मिनिटाच्यावर नळाला येत नसल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. शहरात गटार योजनेसाठी चांगलेे रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यावर जागोजागी खड़्डे पडल्याने नागरिकांना पावसाळ्यात रस्त्यात खड्डा शोधत आपला जिव वाचवावे लागणार आहे. अशा अनेक समस्यांनी गडचिरोली शहरातील नागरिक त्रस्त असून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे पत्रकात रुचित वांढरे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्षांचा भोंगळ कारभार-रुचित वांढरे
समन्वय नसल्याने शहरातील जनतेची व वॉर्डाची गैरसोय





