
गोंदिया,दि.११– विदर्भ तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना शाखा गोंदियाच्यावतीने उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन आज गुरुवारला(दि.११)गोंदिया तालुक्यातील तेढवा येथील वाळू घाटावर महसुल विभागाच्या पथकावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदविण्यात आले.तसेच सदर आरोपीवंर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सविस्तर असे की,गोंदिया तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसिलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक आज गुरुवारला सकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करीत असताना वाळूची चोरी करुन ती वाहतूक करीत असतांना कारवाईसाठी गेले असता ट्रक्टर,ट्रक चालक व मालकांसह हमालांनी लाठ्याकाठ्यासंह दगडाने हल्ला केला.यात नायब तहसिलदार सचिन पाटील व पथकात असलेल्या तलाठी बुचे,हटवार,राठोड व भोयर हे किरकोळ जखमी झाले.तसेच खासगी वाहनाच्या काच्या फोडण्यात आल्या.या हल्ल्यादरम्यानच पथकाने पकडलेले वाळूचे वाहन वाळूमाफियांनी बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली.याप्रकरणात रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात दुसèयांदा घटना घडल्याने सतत कर्तव्यावरील अधिकारी कर्मचारीवर होणारे हमले दुर्देवी असल्याने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान तलाठी संघटनेने गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत घटनेचा निषेध नोंदवित आरोपीवर कडक कारवाईची व पथकाला पोलीस सरंक्षण देण्याची मागणी केली आहे.तेढवा येथील वाळुघाटावार गोंदियातील काही राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आशीर्वादानेच वाळूचा अवैध उपसा सुरु असल्याचे वृत्त असून यात विरोधकासह सत्ताधारी पक्षातील काही तथाकथित नेत्यांचे त्या वाळूमाफियांना समर्थन असल्याचे बोलले जाते.





