गडचिरोली,दि..१२: पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना काल(दि.११)रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलीस मदत केंद्रांतर्गत किदरीटोला गावाजवळ घडली. रवी जुरु पुंगाटी असे मृत युवकाचे नाव असून, तो गुंडजूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ११ वाजताच्या सुमारास सशत्र नक्षली रवी पुंगाटीच्या घरी गेले. त्यांनी रवीला गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. नक्षल्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही टाकली असून, त्यात रवी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.





