27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तिरोडा तालुक्यातील 10 ते 14 गावात टोळधाडीचे आगमन,कृषी विभाग सतर्क

तिरोडा तालुक्यातील 10 ते 14 गावात टोळधाडीचे आगमन,कृषी विभाग सतर्क

0
770

गोंदिया,दि.12ः गेल्या काही दिवसापुर्वीच जिल्ह्यातील सिमेला लागून तिरोडा तालुक्यातून टोळधाड मध्यप्रदेशकडे सरकली असतानाच पुन्हा आज शुक्रवारला(दि.12) पुन्हा जिल्ह्यावर टोळधाडीचे संकट घोंगावत असल्याने खरिपाच्या तयारीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्याची हद्द ओलांडत भंडारा जिल्ह्यात दाखल झालेली टोळधाड आज शुक्रवारला तिरोडा तालुक्यातील सरांडी,पांजरा,मुंडिकोटा,नवेगावसह 10 ते 14 गावपरिसरातील शेतात हवेच्या दिशेप्रमाणे दाखल झाली आहे. या गाव परिसरामध्ये दाखल झालेल्या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्यावतीने सकाळी एकदा फवारणी करण्यात आली सद्या काचेवानी मार्गे टोळधाड पुन्हा मध्यप्रदेशच्या दिशेने जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक गणेश घोरपडे यांनी दिली.रात्रीला स्थिर झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास पु्न्हा फवारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात दाखल झालेली टोळधाड पुन्हा मध्य प्रदेशात परतली होती. त्याकरिता कृषी विभागाकडून व्यापक प्रयत्न करण्यात आले. कृषी आयुक्‍तालय स्तरावरून फवारणी कामी ड्रोनची उपलब्धता देखील करण्यात आली. याच दरम्यान टोळधाड मध्य प्रदेशात गेल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता.परंतु, आठवडाभरानंतर टोळधाड पुन्हा विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांची चिंतादेखील वाढीस लागली आहे. खरीप हंगाम दारावर असल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. काही भागात पाऊस पडल्यानंतर पेरणीचे कामही झाले. काही भागात धान पीक अंकुरले असल्याने अशा पिकाचा फडशा टोळधाड पाडण्याची भीती वर्तविली जात आहे. परिणामी संपूर्ण खरीप हंगामावर टोळधाडीचे सावट निर्माण झाले आहे.

दहा किमी लांब आणि दोन किमी रूंद टोळधाड तिच्या मार्गातील सर्व प्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या किडीचे थवे १२ ते १६ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने उडतात. टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडून जाताना दिसेल. वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्त्वाची कीड असून जेव्हा ही कीड समूहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते वाळवंटी टोळ आपली अंडी रेतीमध्ये १० ते १५ सेंटिमीटर आत समूहाने घालतात. एक मादी साधारणत दीडशे ते दोनशे अंडी घालते. सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवस दिवसात उबवतात. पिल्लावस्था २२ दिवसात पूर्ण होते आणि प्रौढावस्था लांबपर्यंत उडून नुकसान करते.