27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ मासेमार समाजाच्या समस्यांची दखल घ्या – आ. चंद्रिकापुरे

मासेमार समाजाच्या समस्यांची दखल घ्या – आ. चंद्रिकापुरे

0
169

सडक अर्जुनी,दि.15 : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यातच मासेमारी करून उपजिविका चालणारे मासेमार समाजावरही याचा फटका बसला असून मासेमार करणारे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने मासेमार समाजांची दखल घेवून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी मासेमार समाजाकडून करण्यात आली. मागणीचे निवेदन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांना देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २३ मार्चपासून देशासह राज्यात लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे मार्च महिन्यापासून गोड्या पाण्यातील मासेमारी करणारे समाज आर्थिक संकटात सापडले आहेत. संचारबंदी असल्याने मासेमारी करू शकले नाही, शिवाय उन्हयात नद्या, नाल्यांमध्येही मासेमारी करता आली नाही. ज्या मासेमारांनी तलाव घेवून माश्यांचे उत्पादन घेतले त्यांना उत्पन्न काढता आले नाही. त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मासेमारांना शासनाकडून न्याय देण्यात यावा, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत असलेल्या तलावांची लीज माफ करण्यात यावी, जिल्ह्यातील मासेमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या मार्फत शासनाला सादर करण्यात आले.
यावेळी उमराव मांढरे, शोभराम मलाम, राजु शेंडे, हस्कू भानारकर, मंगर वलथरे, शिवचरण वलथरे, सुनील शेंडे, मनोहर सयाम, छगनलाल मेश्राम, सोमा मेश्राम, मनोहर मेश्राम, तेजराम मेश्राम, अभिमन भांडारकर आदी उपस्थित होते.