32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ नेरी ग्रामपंचायतीला केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

नेरी ग्रामपंचायतीला केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

0
757

blank

भंडारा,दि.23ःग्रामस्तरावर विकासकामे आणि शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी केल्याबद्दल मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीला केंद्रसरकारचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराने ग्रामपंचायतीने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सरपंच आनंद मलेवार आणि ग्रामसेविका निरंजना खंडाळकर यांच्या दूरदृष्टीने गावात वेगाने विकासकामे करण्यात आली.ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रीय सहभाग आणि नागरिकांचा पुढाकारही यासाठी महत्वाचा ठरला. ग्रामपंचायतीने गावविकासाचा निर्धार घेतला. सरपंच आनंद मलेवार यांच्या मार्गदर्शनात तीन वर्षात गावाचा कायापालट करण्यात आला. नेरीची लोकसंख्या २२३५ आहे. गाव लहान असले तरी समस्या अनेक होत्या. मात्र या समस्यांवर मात करून लोकोपयोगी प्रयोग राबविण्यात आले. सदर पुरस्काराच्या निकषानुसार ग्रामपंचायतीने वार्षिक ग्रामसभा, मासिक सभा नियोजित केल्या. लोकसहभागावर भर दिला. ग्रामसभेत कामांचे नियोजन केले. त्याला गती दिली. शासनाने ठरवून दिलेले पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना विहित मुदतीत पूर्ण केले. मग्रारोहयो अंतर्गत शेळीपालन, गुरांचा गोठा, सिंचन विहिरींची कामे करण्यात आली. पाच टक्के दिव्यांग निधी, १० टक्के महिला व बालकल्याण निधी, १५ टक्के इतर मागासवर्गीय निधी खर्च केला. पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी, आठवडी बाजार, सुसज्ज व्यायामशाळा अशा योजना पूर्णत्वास नेल्या.जनजागृतीसाठी कलापथक, भित्तीपत्रके, फलक, पेंटींग तयार केले. लोकसहभागांतर्गत २०१८-१९ मध्ये नागरिकांकडून ८४ हजारांची लोकवर्गणी गोळा करण्यात आली. गावाच्या या विकासाची दखल घेत सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी दिली. विकासकामात सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, सदस्य कमलेश वैद्य, अजय लांजेवार, विठ्ठल गेडाम, लक्ष्मी पालांदूरकर, रिता मेश्राम, निरंजना हजारे, प्रतीमा भांडारकर, साधना पडोळे, कर्मचारी श्रीराम वैद्य, केशव देशमुख, दीपक ढोमणे, अनिल पडोळे, राजकुमार हजारे यांचे सहकार्य लाभले.

blank