30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकाऱ्यांची तिरोडा उप-जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट

जिल्हाधिकाऱ्यांची तिरोडा उप-जिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट

0
447

गोंदिया दि.26 (जिमाका) राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हयातील आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अलीकडेच तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली व रुग्णालयातील कामकाज व व्यवस्थेचा आढावा घेतला.

विशेष म्हणजे जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती ह्या आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे.तिरोडा तालुक्यातील विविध आजार असलेल्या रुग्णांवर चांगले उपचार या रुग्णालयात झाले पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरली.

उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असलेले उपचार तसेच रुग्णालयात उपलब्ध सोयी-सुविधेची माहिती डॉ.बलकवडे यांनी घेतली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून फिव्हर क्लीनिकमध्ये येत असलेल्या रुग्णांची देखील माहिती जाणून घेतली.फिव्हर क्लिनीकमध्ये येणाऱ्या नागरिकांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर प्रकारच्या आजाराची लक्षणे असल्यास त्यांचे उपचार व देखरेखीची प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते याबाबतही माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या भेटीप्रसंगी तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपदे, तहसिलदार प्रशांत घोरुडे, तालुका आरोग्य अधिकारी अभय पाटील व इतर कार्यरत अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आढावा घेतांना जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी स्वत: रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून रेकार्ड तपासणी केली. रुग्णालयाच्या ठिकाणी काही कामात अनियमितता आढळल्यावर संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावीत केली.
तसेच या बाबतचा अहवाल बोलवून जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना संबंधित यंत्रणेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.

फिव्हर क्लिनीकमध्ये येणाऱ्या एकुण प्रकरणापैकी रेकार्ड तपासल्यावर ताप व यु.आर.आई चे लक्षण असलेल्या चिरेखनी गावातील देबीलाल पारधी, कविता राऊत, भाग्यश्री कोटांगले या तीन रुग्णाच्या कुटुंबाच्या घरी जाऊन जिल्हाधिकारी डॉ बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली. तसेच त्यांना कुठलेही आजाराची लक्षणे नसल्याची खात्री केली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या चमुला कंटेंटमेंट झोनमधुन येणाऱ्या नागरिकांची विशेष निगराणी व देखरेख करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य विषयक यंत्रणेला आणखी सक्षम करण्यासाठी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तिरोडा व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एकत्र येऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन त्या बाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी वेळी दिले.