38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात गोंदिया राज्यात प्रथम

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात गोंदिया राज्यात प्रथम

0
357

गोंदिया,दि.27 जूनः क्षयरोग म्हटले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु योग्य औषधोपचार, समतोल आहार घेतल्यास या रोगावर सहज मात करता येते. क्षयरोगाने बाधित रुग्ण दगावू नये म्हणून शासनातर्फे जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्यांपेक्षा अधिक असल्याने जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.                                                           महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात क्षयरुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने गोंदिया जिल्ह्याला राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात प्रथम स्थान मिळाले आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालयानेही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांना गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी २५ जून रोजी जिप सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात प्रशस्तिपत्र देऊन गौरविले.                                                                                                                    आजही समाजात अनेक रोगांबाबत गैरसमज आहेत. विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना समाज व कुटुंबांचे सहकार्य मिळत नाही. परिणामी प्राण गमावण्याची वेळ अशा रुग्णांवर येते. देशात क्षय रुग्णांची संख्या मोठी असली तरी बरे होणाèया रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात गोंदिया जिल्ह्याचाही सहभाग आहे. गोंदिया जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक व कर्मचारी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यात राष्ट्रीयक्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील अधिकारी-कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, एनजीओ, खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाèयांसह क्षेत्रीय कर्मचारी, आशा वर्कर यांच्या माध्यमातून क्षयरोग आजाराबद्दल जनजागृती व सर्वेक्षण करण्यात येते.क्षयरोगाची खात्री झाल्यावर रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यात येतात. रुग्णांना डॉट्स उपचार पद्धतीद्वारे औषधांचे वितरण करण्यात येते. रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित सहा महिने औषधोपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णतः बरा होतो. जर या रोगाची काळजी घेतली नाही आणि योग्य औषधोपचार केला नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यताही असते. क्षयरुग्णाने धूम्रपान, मद्यपान आदी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. रुग्णास शासनाच्या वतीने प्रतिमहिना पाचशे रुपये पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. क्षयरोगावरील औषधोपचार पूर्णतः निःशुल्क आहे. मागील वर्षी डिसेंबरअखेर जिल्ह्यात जवळपास १९०० रुग्ण होते. जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते मे २०२० या काळात ६६१ क्षयरुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

blank